ब्रिटन आणि फ्रान्स यांनी १९६० च्या दशकात संयुक्तरीत्या विकसित केलेले जग्वार हे आधुनिक काळातील एक उत्तम फायटर-बॉम्बर, ग्राऊंड अॅटॅक किंवा क्लोझ एअर सपोर्ट प्रकारचे विमान आहे. जग्वार आता कालबाह्य़ ठरल्याची चर्चा होत असली तरी आजही ते कोणत्याही हवामानात, शत्रुप्रदेशात खोलवर घुसून मोठय़ा प्रमाणात, अचूक बॉम्बहल्ले करण्याची क्षमता बाळगून आहे. भारतासह अनेक देशांच्या हवाईदलात ते आजवर सेवेत आहे.
ब्रिटन आणि फ्रान्सला १९६५ च्या दरम्यान एक चांगले प्रशिक्षण आणि टॅक्टिकल सपोर्ट प्रकारचे विमान हवे होते. ब्रिटनला त्यांची हॉकर हंटर आणि फॉलंड नॅट ही विमाने बदलण्यासाठी त्याची गरज होती, तर फ्रान्सलाही दुहेरी भूमिका वापरता येणारे विमान हवे होते. त्यातून सेपेकॅट जग्वार या विमानाची निर्मिती झाली. हे विमान इतके प्रभावी होते की, ब्रिटनने प्रामुख्याने जमिनीवरील हल्ले आणि बॉम्बरच्या भूमिकेत वापरले. ब्रिटन आणि फ्रान्स एकाच वेळी, एकत्रितपणे कॉन्कॉर्ड हे सुपरसॉनिक प्रवासी विमान आणि जग्वार हे लढाऊ विमान विकसित करत होते. जग्वारचे प्रारूप १९६८-१९६९ मध्ये तयार झाले. पहिल्याच चाचणी उड्डाणात जग्वारने ध्वनीच्या वेगाची मर्यादा पार केली. ब्रिटन आणि फ्रान्सने १९७३ च्या दरम्यान प्रत्येकी २०० जग्वार आपापल्या हवाईदलांत सामील केली. त्यासह भारत, ओमान, नायजेरिया आणि इक्वेडोर या देशांना जग्वार निर्यातही केली.
जग्वार ताशी १६९९ किमी वेगाने १४०० किमी त्रिज्येच्या क्षेत्रात प्रभावीपणे लढू शकते. त्यावर ३० मिमी व्यासाच्या दोन कॅनन, ४५४० किलो वजनाचे साधे किंवा लेझर गायडेड बॉम्ब, रॉकेट, साइडवाइंडर क्षेपणास्त्रे आदी शस्त्रसंभार बसवता येतो. त्यासह ते अण्वस्त्रेही वाहून नेऊ शकते. त्यामुळे शीतयुद्धाच्या काळात जग्वार प्रामुख्याने पश्चिम जर्मनीतील तळांवर सोव्हिएत युनियनविरुद्ध तैनात असत. जग्वार इराक, अफगाणिस्तान, सीरिया युद्धांत वापरली गेली. भारताने श्रीलंकेतील शांतिसेनेच्या मदतीसाठी आणि कारगिल युद्धात जग्वार वापरली.
sachin.diwan@expressindia.com