ब्रिटिश मेन बॅटल टँक चॅलेंजर-१ आणि त्यानंतरचा सुधारित चॅलेंजर-२ हे सध्याच्या काळातील सर्वोत्तम रणगाडय़ांपैकी एक आहेत. १९९१ साली इराकच्या ताब्यातून कुवेत सोडवण्यासाठी बहुराष्ट्रीय फौजांनी केलेल्या ‘डेझर्ट स्टॉर्म’ या कारवाईत चॅलेंजर-१ रणगाडय़ांनी आणि त्यानंतरच्या कारवायांत चॅलेंजर-२ रणगाडय़ांनी केलेल्या कामगिरीने हे रणगाडे विशेष चर्चेत आले.

वास्तविक चॅलेंजर रणगाडय़ांचे मूळ ‘शिर-२’ नावाच्या ब्रिटिश रणगाडय़ात आहे. ब्रिटनने शिर-२ हे रणगाडे खास इराणसाठी विकसित केले होते. पण १९७९ सालच्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणने शिर-२ रणगाडय़ांसाठी नोंदवलेली मागणी रद्द केली. त्यानंतर ब्रिटनने हा रणगाडा अधिक विकसित करून स्वत:च्या सैन्यासाठी वापरण्याचे ठरवले. त्याची मूळ रचना इराणच्या वाळवंटी प्रदेशाला साजेशी होती. त्यात बदल करून ती युरोपीय वातावरणाला अनुकूल करण्यात आली.

मार्च १९८३ मध्ये चॅलेंजर-१ रणगाडा ब्रिटिश सैन्यात दाखल झाला. ते प्रथम जर्मनी आणि नंतर सौदी अरेबियात तैनात केले गेले. पुढे १९९१ च्या इराक युद्धात त्यांनी स्वत:चे काहीही नुकसान होऊ न देता इराकचे ३०० रणगाडे आणि चिलखती गाडय़ा नष्ट केल्या. १२० मिमीची रायफल्ड गन आणि ‘चोभम’ नावाचे खास विकसित केलेले चिलखत या चॅलेंजरच्या जमेच्या बाजू होत्या. त्याची तोफ अत्यंत अचूक आणि प्रभावी होती. पण फायर कंट्रोल आणि साइटिंग सिस्टिम सदोष होती. त्यामुळे तोफेचा ‘रेट ऑफ फायर’ किंवा तोफगोळे डागण्याचा वेग कमी होता. चॅलेंजर-२ मध्ये ही त्रुटी भरून काढण्यात आली.

व्हिकर्स डिफेन्स सिस्टिम्स (नवे नाव- बीएई सिस्टिम्स) या कंपनीची चॅलेंजर-२ ही अजोड निर्मिती आहे. चॅलेंजर-२ जून १९९८ मध्ये ब्रिटिश लष्कराच्या रॉयल स्कॉट्स आणि ड्रगून गार्ड्स या तुकडय़ांमध्ये दाखल झाला. त्यांनी बोस्निया, कोसोवो आणि २००३ सालच्या ‘ऑपरेशन इराकी फ्रीडम’ या कारवायांत भाग घेतला. सध्या ब्रिटनसह ओमानचे हे मेन बॅटल टँक्स आहेत.

चॅलेंजर रणगाडय़ांची खासियत म्हणजे त्यावरील ‘चोभम’ नावाचे चिलखत. इंग्लंडच्या सरे भागातील चोभम या गावात त्यांचे संशोधन झाले म्हणून त्याला चोभम हे नाव ठेवले गेले. त्याला ‘बर्लिग्टन’ किंवा ‘डॉर्चेस्टर आर्मर’ असेही म्हणतात. त्याची नेमकी रचना हे गुपित असले तरी ते अतिकठीण धातू आणि सिरॅमिक मटेरिअल्सच्या मिश्रणातून बनवले गेले आहे. त्यात कार्बन नॅनोटय़ूब आदींचा वापर केला आहे. त्यामुळे चॅलेंजरला शत्रूच्या आरपीजी, शेप्ड चार्ज, हाय एक्स्प्लोझिव्ह अँटिटँक, कायनेटिक एनजी पेन्रिटेटर्स आदी प्रकारच्या रणगाडाभेदी शस्त्रांपासून उत्तम संरक्षण मिळाले आहे.

sachin.diwan@expressindia.com