सुरुवातीला तोफेची नळी बनवण्यासाठी धातूच्या लांब पट्टय़ा एकत्र वर्तुळाकार जोडल्या जात. ही रचना लाकडी पट्टय़ांचे बॅरल किंवा पिंप तयार केल्यासारखीच असे. त्यावरून तोफेच्या किंवा बंदुकीच्या नळीला गन बॅरल म्हटले जाऊ लागले. तोफांचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात – कॅनन, हॉवित्झर आणि मॉर्टर. कॅनन किंवा फिल्ड गनच्या बॅरल किंवा नळीची लांबी जास्त असते. कॅननच्या गोळ्याचा हवेतील भ्रमणमार्ग (ट्रॅजेक्टरी) सपाट जमिनीला बराचसा समांतर असतो. तो फारसा वक्राकार नसतो. त्यामुळे कॅनन किंवा फिल्ड गन प्रामुख्याने उघडय़ा मैदानातील सैन्य किंवा तत्सम लक्ष्यांविरुद्ध वापरतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅननच्या तुलनेत हॉवित्झरचे बॅरल थोडे तोकडे किंवा कमी लांबीचे असते. हॉवित्झरचा गोळा हवेतून बराचसा लंबवर्तुळाकार (इलिप्टिकल) मार्गाने प्रवास करतो. त्यामुळे हॉवित्झर किल्ला किंवा शहराची तटबंदी भेदण्यास उपयोगी ठरतात. तसेच त्यांचे गोळे तटबंदी किंवा डोंगरांच्या पलीकडेही मारा करू शकतात. याच कारणाने कारगिलच्या युद्धात पर्वतमय प्रदेशात बोफोर्सच्या १५५ मिमी हॉवित्झर तोफा अत्यंत प्रभावी ठरल्या होत्या.

मॉर्टर किंवा उखळी तोफांचा पल्ला कॅनन आणि हॉवित्झरच्या मानाने खूपच कमी असतो. मॉर्टर उखळ आणि मुसळाच्या आकाराच्या असतात. त्यांचे बॅरल लांबीने खूपच कमी असते. मॉर्टरचा गोळा खूपच उंची गाठून अधिक लंबवर्तुळाकार मार्गाने प्रवास करतो. त्यामुळे मॉर्टर तटबंदीपलीकडे मारा करण्यास उपयुक्त ठरतात. तसेच एखाद्या ठाण्यावर हल्ला करताना अखेरच्या टप्प्यात वापरल्या जातात.

तोफांच्या गोळ्यांचे ढोबळमानाने शॉट आणि शेल असे प्रकार पडतात. शॉट म्हणजे धातूचे किंवा दगडाचे भरीव गोळे असतात. त्यात सुधारणा करून काही उपप्रकार निर्माण झाले. त्यात दोन गोळ्यांना मध्ये साखळी किंवा धातूची कांब लावून चेन-शॉट आणि बार-शॉट तयार झाले. अशा प्रकारचे गोळे मानवी लक्ष्याच्या विरोधात उपयुक्त ठरत. नुसते एकेरी गोळे सैन्य आणि तटबंदी अशा दोन्हींविरोधात वापरले जात. ग्रेप-शॉट आणि केस-शॉट या प्रकारांत अनेक गोळे एकत्र बांधून एकाच वेळी डागले जात. तोफेतून बाहेर पडल्यावर ते विस्तृत प्रदेशात पसरून मोठे नुकसान करीत. शेल या प्रकारात तोफगोळयाचे बाह्य़ कवच धातूचे असते आणि त्याच्या आत स्फोटके आणि धातूचे गोळे किंवा छर्रे भरलेले असतात. ब्रिटिश लष्करातील माजी अधिकारी हेन्री श्रापनेल यांच्या नावावरून त्या छऱ्र्याना श्रापनेल असे नाव पडले. तोफगोळ्यांचे जमिनीवर पडून आणि हवेत फुटणारे असेही प्रकार आहेत.

रणगाडाविरोधी, विमानवेधी, जहाजांवरील तोफा आणि मल्टिबॅरल रॉकेट लाँचर यांचाही तोफखान्यात समावेश होतो.

sachin.diwan@expressindia.com