गॅटलिंग गन प्रामुख्याने हाताने फिरवावी लागत असल्याने तिच्या वापरावर मर्यादा होत्या. १८८० च्या दशकात स्मोकलेस पावडरचा शोध लागल्यानंतर ही अडचण दूर झाली. नेहमीच्या गनपावडरच्या ज्वलनातून निर्माण होणारा धूर आणि वायू अनियमित असे. स्मोकलेस पावडरचे ज्वलन अधिक नियमित प्रकारे होते. त्यातून निर्माण होणाऱ्या बंदुकीच्या धक्क्य़ाचा किंवा रिकॉइलचा वापर करून बंदुकीतून झाडलेल्या गोळीचे रिकामे आवरण बाहेर फेकणे आणि नवी गोळी फायरिंग चेंबरमध्ये आणणे ही कामे करता येऊ लागली. हे तंत्र वापरून अमेरिकेतील हिरम स्टीव्हन्स मॅग्झिम यांनी १८८४ साली ऑटोमॅटिक मशिनगन बनवली. ती मॅग्झिम मशिनगन म्हणून गाजली. त्यांच्या पाठोपाठ ते तंत्र वापरून हॉचकिस, लेविस, ब्राऊनिंग, मॅडसन, माऊझर आदींनीही मशिनगन बनवल्या. आता खऱ्या अर्थाने मशिनगन युग अवतरले होते आणि रणांगणावर मृत्यू थैमान घालू लागला होता.
कोणत्याही मशिनगनला उष्णता ही मुख्य अडचण भेडसावत होती. बंदुकीच्या दारूचा चेंबरमध्ये होणारा स्फोट, त्यातून निर्माण होणारे गरम वायू आणि तापलेली गोळी बंदुकीच्या बॅरलच्या आतील पृष्ठभागावर घासून वेगाने बाहेर पडताना बरीच उष्णता निर्माण होते. त्याने मशिनगनचे बॅरल खूप तापते. परिणामी मशिनगन एक तर जॅम होऊ शकते किंवा ट्रिगर न दाबदाच सलग गोळ्या झाडल्या जाऊ शकतात. त्यामुळे मशिनगन थंड ठेवणे हे तिच्या रचनाकारांसाठी एक आव्हान असते. मॅग्झिम यांनी ही अडचण सोडवण्यासाठी बॅरलच्या भोवतीने धातूचे दंडगोलाकार आवरण बसवून त्यात पाणी खेळते ठेवले होते. त्यामुळे मशिनगन थंड राहत असे. याला वॉटर-कुल्ड सिस्टम म्हटले जाते.
मॅग्झिम मशिनगनचे वजन साधारण २७ किलो होते. त्यात कॅनव्हासवर बसवलेल्या २५० गोळ्यांचा पट्टा भरला जायचा. त्यात .३०३ कॅलिबरच्या गोळ्या वापरल्या जात. मॅग्झिम मशिनगन मिनिटाला ५५० ते ६०० गोळ्या झाडू शकत असे. ती चालवण्यासाठी ४ सैनिक लागत. मशिनगनच्या वजनामुळे ती एकटय़ाला उचलणे अवघड होते. त्यामुळे ती युद्धभूमीवर एका ठिकाणाहून दुसरीकडे लगेच नेता येत नसे. एकाच ठिकाणाहून तिला फायर करावे लागे.
पुढे १८९६ साली मॅग्झिम यांची कंपनी ब्रिटनच्या व्हिकर्स लिमिटेड या कंपनीने विकत घेतली. त्यांनी मॅग्झिम मशिनगनमध्ये सुधारणा करून व्हिकर्स मशिनगनची निर्मिती केली. मूळच्या मॅग्झिम मशिनगनच्या कार्यपद्धतीत काही बदल केले. तिचे वजन कमी केले. काही सुटय़ा भागांसाठी मिश्रधातू वापरले गेले. त्याने मशिनगनची ताकद वाढली. तसेच बॅरलच्या पुढील टोकाला मझल बूस्टर बसवण्यात आला. त्याने रिकॉइलची ऊर्जा अधिक कार्यक्षमतेने वापरता येते आणि बंदूक आणखी खात्रीलायक बनते. ब्रिटिश लष्कराने नोव्हेंबर १९१२ मध्ये व्हिकर्स मशिनगन त्यांची स्टँडर्ड मशिनगन म्हणून स्वीकारली. त्याच्या जोडीने मॅग्झिम मशिनगनही वापरात होती.
आतापर्यंत विमानांचा उगम होऊन ती युद्धात वापरली जाऊ लागली होती. विमानावर मशिगनग बसवण्यासाठी वैमानिकाच्या पुढील जागा सर्वात योग्य होती. पण तेथे मशिनगनच्या गोळ्यांच्या वाटेत प्रोपेलरची पाती येत असत. यावर मात करण्यासाठी ‘गन सिन्क्रोनायझरचा’ शोध लागला. त्यात प्रोपेलरची पाती आणि मशिनगनचा मेळ साधून फिरत्या पात्यांच्या मधून गोळ्या झाडल्या जातात. व्हिकर्स बायप्लेन या विमानात १९१३ साली ही प्रणाली बसवली गेली.
सचिन दिवाण
sachin.diwan@expressindia.com