दुसऱ्या महायुद्धाच्या उत्तरार्धात ब्रिटनने घाईगडबडीत, मिळेल त्या साधनांनिशी तयार केलेल्या स्टेन गनने वेळ मारून नेली होती. पण महायुद्ध संपल्यानंतर स्टेन गनच्या जागी नवी चांगली सब-मशीनगन किंवा कार्बाइन तयार करण्याची गरज भासू लागली. त्यातून स्टर्लिग सब-मशीनगन किंवा कार्बाइन तयार झाली. तिने साधारण १९९० च्या दशकापर्यंत ब्रिटिश लष्कराची साथ केली. त्यानंतर स्टर्लिंग कार्बाइनची जागा एल ८५ ए १ असॉल्ट रायफलने घेतली. या संपूर्ण कालावधीत स्टर्लिग कार्बाइनने चांगली सेवा दिली.

ब्रिटिश लष्कराने १९४४ च्या दरम्यान नव्या सब-मशीनगनसाठी निकष जाहीर केले. नवी बंदूक सहा पौंड (२.७ किलोग्रॅम) पेक्षा कमी वजनाची असली पाहिजे, तिच्यातून ९ मिमी व्यासाच्या आणि १९ मिमी लांबीच्या पॅराबेलम गोळ्या झाडता आल्या पाहिजेत, गोळ्या झाडण्याचा वेग मिनिटाला किमान ५०० असला पाहिजे आणि १०० यार्डावरून गोळ्या झाडल्या तर त्या लक्ष्यावर किमान १ चौरस फुटाच्या आत लागल्या पाहिजेत असे निकष घालून देण्यात आले. त्यावर आधारित बंदुकांची डिझाइन विकसित करून तपासण्यात आली.

दागेनहॅम येथील स्टर्लिग आर्मामेंट्स कंपनीचे मुख्य डिझायनर जॉर्ज विल्यम पॅशेट यांनी डिझाइन केलेली बंदूक या निकषांचे बऱ्याच प्रमाणात पालन करत होती. ती बरीचशी स्टेन गनसारखीच दिसत असली तरी त्यात अनेक सुधारणा केलेल्या होत्या. युद्धाच्या अखेरीस त्याची काही प्रारूपे तयार करून ती वापरून पाहण्यात आली. त्याने ब्रिटिश लष्कराचे समाधान झाले. त्यानंतर १९५१ च्या दरम्यान लष्कराने ही नवी बंदूक स्वीकारण्याची तयारी दाखवली आणि १९५३ साली ती बंदूक स्टर्लिग सब-मशीनगन एल २ ए १ या नावाने स्वीकारण्यात आली.

या नव्या बंदुकीतही बाजूने बसवले जाणारे मॅगझिन होते. बंदुकीच्या बॅरलवर धातूचे जाळीदार आवरण होते. धूळ आणि मातीपासून संरक्षण करण्यासाठी खास सोय होती. तसेच पुढे संगीन लावण्याचीही सोय होती. सब-मशीनगनला संगीन बसवणे ही तशी विशेष बाब होती. स्टर्लिगच्या मॅगझिनमध्ये ३२ गोळ्या मावत आणि ती मिनिटाला ५५० च्या वेगाने गोळ्या झाडू शकत असे. तिचा पल्ला २०० मीटर होता.

ब्रिटनसह अन्य देशांनीही स्टर्लिग कार्बाइनचा वापर केला. अरब-इस्रायलमधील १९५६ चे सुएझचे युद्ध, व्हिएतनाम युद्ध, ब्रिटन आणि अर्जेटिना यांच्यातील १९८२ सालचे फॉकलंड युद्ध आदी युद्धांमध्ये तिचा वापर झाला. १९९१ साली सद्दम हुसेनच्या इराकने बळकावलेल्या कुवेतच्या मुक्ततेसाठी बहुराष्ट्रीय फौजांनी केलेल्या कारवाईत ब्रिटनच्या वतीने स्टर्लिग कार्बाइनच्या अखेरच्या बॅचचा वापर केला गेला. भारतानेही स्टर्लिग कार्बाइन स्वीकारली होती आणि भारतात तिचे परवान्याने उत्पादनही होत होते. मात्र २०१० साली भारताने तिचा वापर बंद केला. आता स्टर्लिग कार्बाइनच्या जागी नव्या कार्बाइन घेण्यासाठी भारतीय लष्कराने पुन्हा खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे.

– सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

Story img Loader