दुसऱ्या महायुद्धानंतर मशीनगन या शस्त्रप्रकारात काही बदल येऊ घातले. तत्पूर्वी लाइट, मिडियम आणि हेवी असे मशीनगनचे साधारण प्रकार असत आणि आजही ते अस्तित्वात आहेत. पण या सर्व प्रकारांचे काम करणारी, तसेच हेलिकॉप्टर आणि जीपवर बसवता येणारी सर्वसमावेशक मशीनगन विकसित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. त्यातून जनरल पर्पज मशीनगन (जीपीएमजी) तयार झाली. मूळ शस्त्रात थोडेफार बदल करून ते विविध कामांसाठी वापरता येते. या प्रकारात जर्मन ऱ्हाइनमेटल कंपनीची एमजी-३ ही मशीनगन विशेष गाजली. १९६० च्या दशकात तयार झालेली मशीनगन शीतयुद्धाच्या काळात युरोपसह अन्य ३० देशांच्या लष्कराने वापरली आणि काही देशांत ती आजही वापरात आहे. इटली, स्पेन, पाकिस्तान, ग्रीस, इराण, सुदान आणि तुर्कस्तान या देशांत तिची निर्मितीही होते.
एमजी-३ मशीनगनचे मूळ दुसऱ्या महायुद्धात जर्मनीत वापरात असलेल्या एमजी ४२ या मशीगनमध्ये आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीची पूर्व आणि पश्चिम जर्मनीत विभागणी झाली आणि पश्चिम जर्मनीच्या सैन्याला नव्या मशीनगनची गरज भासू लागली. त्यातून एमजी- ३ मशीनगन आकारास आली. तिच्यामध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो) संघटनेच्या सैन्यातर्फे वापरण्यात येणाऱ्या ७.६२ मिमी व्यासाच्या गोळ्या वापरल्या जातात. त्या बेल्टने मशीनगनमध्ये भरल्या जातात. एमजी-३ मिनिटाला ७०० ते १३०० च्या वेगाने साधारण १२०० मीटर अंतरापर्यंत गोळ्या झाडू शकते. मशीनगन दोन किंवा तीन पायांच्या स्टँडवर बसवली असता तिच्या पल्ल्यात थोडा फरक पडतो. तो वाढवता येतो. एमजी-३ चे बॅरल क्रोमियमचे आवरण असलेले असते. त्यामुळे त्याची झीज तर कमी होतेच शिवाय ते कमी तापते. त्यामुळे अधिक वापरानंतर बॅरल बदलणे सोपे जाते.
बंदुकीच्या बॅरलच्या टोकाला असलेले उपकरण मझल ब्रेक, फ्लॅश सप्रेसर आणि मझल बुस्टर म्हणून काम करते. त्यामुळे बंदुकीचा मागे बसणारा धक्का कमी होतो, गोळ्या झाडताना बॅरल वर उचलले जाण्याचा परिणाम कमी होतो आणि बाहेर पडणारे गरम वायू आणि आग नियंत्रणात राहते. त्यामुळे बंदुकीची अचूकता वाढण्यास मदत होते.
एमजी-३ मशीनगनचा वापर जर्मनीशिवाय नाटो संघटनेतील आणि अन्य देशांनीही केला. या मशीनगनचा वापर इराण-इराक युद्ध, इराक, अफगाणिस्तान, सीरिया, लेबॅनन, येमेन येथील संघर्षांमध्येही झाला. पाकिस्तानने त्यांच्या वायव्य सरहद्द प्रांतातीत दहशतवाद्यांविरोधी मोहिमेतही या मशीनगनचा वापर केला. जर्मन उत्पादनातील दर्जा एमजी-३ मशीनगनमध्येही अनुभवण्यास मिळतो. याच काळात अमेरिकेने एम-६० ही जनरल पर्पज मशीनगन उपयोगात आणली. पण तिच्यात अनेक त्रुटी असल्याने ती एमजी-३ इतकी प्रभावी ठरली नाही.
– सचिन दिवाण
sachin.diwan@expressindia.com