सभोवतालच्या वातावरणाशी मिळताजुळता ‘घिली सुट’ परिधान करून, तासनतास दबा धरून शत्रूवर पाळत ठेवून, योग्य संधी मिळताच श्वास रोखून बंदुकीचा चाप ओढून, एका गोळीत शत्रूच्या मस्तकाचा अचूक वेध घेणारा शार्प शुटर किंवा स्नायपर अलीकडच्या ‘अमेरिकन स्नायपर’ किंवा तत्सम चित्रपटांतून प्रसिद्ध झाला आहे. मात्र ही संकल्पना अगदी धनुष्य-बाणाच्या काळापासून अस्तित्वात होती. त्याला आता अत्याधुनिक रूप मिळाले आहे.
शत्रूवर बाणांचा किंवा बंदुकीच्या गोळ्यांचा जोरदार वर्षांव करणे ही एक रणनीती. पण युद्धाच्या धामधुमीत शत्रूच्या महत्त्वाच्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना किंवा युद्धसामग्रीला (हाय व्हॅल्यू टार्गेट्स) हेरून अचूक टिपणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. ते काम करणारे खास प्रशिक्षित नेमबाज असतात. त्यांना शार्प शुटर किंवा स्नायपर म्हणतात. शत्रूचे महत्त्वाचे लक्ष्य शोधण्यासाठी आणि त्याचा माग काढण्यासाठी स्नायपरना धोका पत्करून शत्रूप्रदेशातही जावे लागते. तेव्हा लपून राहण्याची क्षमता खूप महत्त्वाची असते. त्यासाठी सभोवतालच्या वातावरणात बेमालूमपणे मिसळून जाण्यासाठी स्नायपर खास ‘घिली सुट’ वापरतात. त्याला वातावरणानुसार रंग-रूप दिलेले असते. हे एक प्रकारचे छद्मावरण किंवा ‘कॅमोफ्लाज’ असते. स्नायपरना शत्रूवर हल्ला करण्याची एखादीच संधी मिळते. ती गमावून चालत नाही. त्यामुळे जगभरच्या स्नायपर्सचे ब्रीदवाक्य आहे – ‘वन शॉट, वन किल’.
हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना खूप संयम बाळगून काम करावे लागते. तासनतास दबा धरून बसावे लागते. मिळालेल्या संधीचे सोने करावे लागते. त्यासाठी नेमबाजीच्या उच्चतम कौशल्यासह एकाग्रता, शरीर आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याचेही कसब अंगी बाणवावे लागते. लक्ष्याचा अचूक वेध घेतल्यानंतरही आपल्या अस्तित्वाचा शत्रूला मागोवा लागू न देण्यासाठी झटावे लागते.
बंदुकीच्या शोधानंतर प्रथम अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धात १७७७ साली साराटोगाच्या लढाईत अमेरिकी वसाहतवाद्यांनी ब्रिटिशांविरुद्ध स्नायपर वापरले. त्याच काळात ब्रँडीवाइनच्या लढाईत कॅप्टन पॅट्रिक फग्र्युसनसमोर जॉर्ज वाशिंग्टन आले होते. पण बेसावध शत्रूला मारणे योग्य नाही म्हणून फग्र्युसन यांना वॉशिंग्टन यांच्यावर गोळी झाडली नाही. मात्र पुढील कारवाईत खुद्द फग्र्युसन मारले गेले.
पहिल्या महायुद्धात जर्मनीने स्नायपर्सचा प्रभावी वापर केला. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या आक्रमणाविरुद्ध सोव्हिएत रशियाच्या पुरुष व महिला स्नायपर्सनी उत्तम कामगिरी केली. रशियाच्या ल्युडमिला पावलिचेंको या महिला स्नायपरने एकटीने ३०० हून अधिक जर्मन सैनिक टिपले होते.
सचिन दिवाण
sachin.diwan@expressindia.com