सोव्हिएत युनियनमध्ये १९६३ साली तयार करण्यात आलेली द्रगुनोव्ह स्नायपर रायफल किंवा एसव्हीडी (Snaiperskaya Vintovka Dragunova) ही जगातील उत्तम स्नायपर रायफलमध्ये गणली जाते आणि भारतासह अन्य अनेक देशांच्या सैन्यामध्ये ती अद्याप वापरात आहे. रशियन लोक द्रगुनोव्हचा उच्चार द्रगुनाफ असा आणि कलाशनिकोव्हचा उच्चार कलाशनिकाफ असा करतात.
दुसऱ्या महायुद्धानंतर स्नायपरसाठी विशेष रायफल तयार करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी रशियात स्नायपर रायफल डिझाइन करण्याची स्पर्धा आयोजित केली होती. त्यात सर्गेई सिमोनोव्ह, अलेक्झांद्र कॉन्स्टंटिनोव्ह आणि येवगेनी द्रगुनोव्ह यांच्या डिझाइनमधून द्रगुनोव्हची निवड करण्यात आली. रशियन सैन्याने १९६३ साली द्रगुनोव्ह त्यांची स्नायपर रायफल म्हणून स्वीकारली. ती वेगवेगळ्या वातारणात अत्यंत खात्रीशीरपणे काम करणारी स्नायपर रायफल म्हणून नावारूपास आली. त्यात ७.६२ मिमी व्यासाच्या गोळ्या वापरल्या जातात. तिच्या मॅगझिनमध्ये दहा गोळ्या मावतात. द्रगुनोव्हच्या गोळ्या आतून पोलादाच्या बनवलेल्या आहेत.
द्रगुनोव्ह गॅस ऑपरेटेड, रोटेटिंग बोल्ट तंत्रावर चालते. तिचे बॅरल वजनाने काहीसे हलके आहे. पण त्यावर क्रोमियमचा मुलामा दिलेला असल्याने त्याची परिणामकारकता वाढली आहे. बॅरलच्या पुढील भागात स्लॉटेड फ्लॅश सप्रेसर बसवलेला आहे. त्यामुळे गोळी झाडल्यानंतर बॅरलमध्ये तयार होणारे वायू आणि आग बाजूला फेकले जातात. त्याने गोळी झाडल्यानंतर बॅरल वर उचलले जाण्याचा परिणाम कमी होतो आणि अचूकता वाढते.
द्रगुनोव्हला पीएसओ-१ प्रकारच्या ऑप्टिकल साइट्स म्हणजे दुर्बीण बसवलेली आहे. याशिवाय धातूच्या साइट्सही आहेत. पीएसओ-१ स्कोपला बुलेट ड्रॉप कॉम्पेन्सेशन एलिव्हेशन अॅड्जस्टमेंट, इल्युमेनेटेड रेंज फाईंडर, इन्फ्रारेड रेंज फाईंडर आदी सोयी आहेत. त्याने लक्ष्याचा कोणत्याही वातावरणात, दिवसा किंवा रात्री वेध घेण्यास मदत होते. द्रगुनोव्हचा दस्ता सैनिकाच्या शरीररचनेनुसार अनुकूल बनवता येतो. तसेच त्याला गालांच्या जाडीनुसार अनुकूल होणारे चिक रेस्टही आहे. द्रगुनोव्हचे बॅरल सेमी-फ्री फ्लोटेड प्रकारचे आहे. द्रुनोव्हचे एक वैशिष्टय़ म्हणजे ती स्नायपर रायफल असूनही तिला संगीन बसवण्याची सोय आहे.
द्रगुनोव्ह स्नायपर रायफलचा पल्ला ८०० मीटर आहे. इतक्या अंतरावर ही रायफल लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. त्यातून मिनिटाला सरासरी ३० गोळ्यांचा वेगाने मारा करता येतो. आजवर रशियन सैन्याने ती अफगाणिस्तान, चेचेन्या आदी संघर्षांत वापरली आहे.
आजवर द्रगुनोव्ह भारतीय सैन्याचीही प्रमुख स्नायपर राहिली आहे. मात्र आता तिचा ८०० मीटरचा पल्ला अपुरा पडत आहे. गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी स्नायपर वरचढ ठरू लागले आहेत. सीमेवर अनेक जवान स्नायपर हल्ल्याला बळी पडत आहेत. त्यामुळे भारताने द्रगुनोव्हच्या जागी नव्या, अधिक पल्ल्याच्या स्नायपर रायफल खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सचिन दिवाण
sachin.diwan@expressindia.com