क्रिमियन युद्ध (१८५३ ते १८५६) आणि अमेरिकी गृहयुद्धात (१८६१ ते १८६५) तोफखान्याने महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर अनेक देशांनी तोफखान्याच्या विकासाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली होती. त्यात युरोपमध्ये आघाडीवर होता तो युवराज विल्हेम यांच्या नेतृत्वाखालील प्रशिया. नेपोलियनच्या काळात फ्रान्सने तोफखान्याच्या विकासात आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतरच्या काही वर्षांत प्रशियाने (जर्मनी) फ्रान्सवर मात करत तोफांच्या विकासात बाजी मारली. त्याचा परिणाम १८७० साली फ्रान्स आणि प्रशिया यांच्यामध्ये झालेल्या युद्धात जाणवला.
फ्रान्सने तोफखान्यासाठी मायट्रेल्यूज मॉडेल १८६६ नावाची मशिनगनसारखी दिसणारी तोफ तयार केली होती. त्यामध्ये १३ मिमी. व्यासाच्या २५ नळ्या (बॅरल) होत्या. पाच बॅरलच्या पाच ओळी एकावर एक अशा ब्राँझच्या आवरणात बसवल्या होत्या. हे शस्त्र एका मिनिटात १३० गोळ्यांचा ५४४ मीटरवर मारा करू शकत असे. तरीही तोफखान्याच्या बाबतीत प्रशियाने त्यांना मागे टाकले होते. फ्रेंचांच्या तोफा जुन्या मझल-लोडिंग पद्धतीच्या आणि ब्राँझच्या होत्या. त्यांचा पल्ला आणि मारक क्षमता कमी होती. त्याउलट प्रशियन युवराज विल्हेम यांनी जातीने लक्ष घालून ब्रिच-लोडिंग, रायफलिंग केलेल्या आणि शक्तिशाली लोखंडापासून बनवलेल्या तोफा बनवून घेतल्या होत्या. त्यात प्रशियाला तेथील क्रुप कुटुंबाच्या पोलादनिर्मितीमधील हातोटीचा फायदा झाला.
प्रशियाच्या तोफखान्यात ४ आणि ६ पौंडी तोफांचा समावेश होता. ४ पौंडी तोफेचा व्यास ७७ मिमी होता. ती १८६४ साली अस्तित्वात आल्याने तिचे नाव मॉडेल सी ६४ असे होते. तिच्या ब्रिच-ब्लॉकमध्ये सुधारणा करून १८६७ साली सी/६४/६७ मॉडेल वापरात आले. तर ६ पौंडी ९१.६ मिमी व्यासाची तोफ १८६१ साली वापरात आली होती. जनरल हेल्मुथ मोल्त्के यांच्या नेतृत्वाखालील प्रशियन तोफखान्याने १८७० च्या फ्रँको-प्रशियन युद्धात मेट्झ आणि सेदान येथील लढायांत फ्रान्सच्या सैन्याचा धुव्वा उडवला.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच १९०४-१९०५ साली रशिया आणि जपानचे युद्ध झाले. त्यात जपानसारख्या उदयोन्मुख आशियाई देशाने रशियासारख्या युरोपीय शक्तीचा पराभव केला. येथेही जपानच्या मदतीला आला तो जर्मन क्रुप उद्योगसमूह. त्यांनी जपानला पुरवलेल्या २० महाकाय ११ इंची हॉवित्झर तोफांनी लियाओतुंग द्वीपकल्पावरील पोर्ट आर्थर येथील रशियन नौदल तळावरील किल्ले आणि युद्धनौकांच्या ठिकऱ्या उडवल्या.
ही अजस्र तोफ २२७ किलोचा (५०० पौंड) तोफगोळा नऊ किलोमीटर अंतरापर्यंत डागू शकत असे. जपानने पोर्ट आर्थरच्या वेढय़ात या तोफांमधून रशियन लक्ष्यांवर ३५,००० गोळे डागले. त्यांच्या तुफान संहारक क्षमतेमुळे रशियन सैनिकांनी या तोफगोळ्यांना ‘रोअरिंग ट्रेन्स’ असे नाव दिले होते.
सचिन दिवाण
sachin.diwan@expressindia.com