सोव्हिएत युनियनशी केलेला अनाक्रमणाचा करार मोडून हिटलरच्या जर्मनीने दुसऱ्या महायुद्धादरम्यान २२ जून १९४१ रोजी ऑपरेशन बार्बारोसाची सुरुवात केली. अल्पावधीत नाझी फौजा हजारभर मैलांचा टप्पा पार करून मॉस्कोच्या वेशीपर्यंत येऊन थडकल्या. मात्र १९४२-४३ साली स्टालिनग्राडच्या युद्धात रशियन लाल सेनेने नाझी फौजांना धूळ चारत परतीच्या मार्गावर रेटले आणि काही महिन्यांत रशियन सेना बर्लिनच्या दारावर टकरा देत होती. या सर्व संग्रामात रशियाच्या एका शस्त्राने जर्मन सैन्याच्या उरात धडकी भरवली होती. त्याचे नाव बीएम-१३ कात्युशा रॉकेट लाँचर किंवा मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टीम (एमएलआरएस).

या शस्त्रात सोव्हिएत युनियनने संहारकता, गतिमानता, अचूकता आणि किफायतशीरपणा यांचा सुरेख संगम साधला होता. नेहमीच्या तोफेच्या किमतीपेक्षा खूप कमी खर्चात कात्युशा रॉकेट लाँचर्स तयार करता येत होते. मात्र त्यांची परिणामकारकता तोफांपेक्षा बरीच जास्त होती. एका बीएम-१३ लाँचरवर १६ रॉकेट बसत असत. प्रत्येक रॉकेट १३२ मिमी व्यासाचे आणि ४२.५ किलो वजनाचे असे. त्यात ४.९ किलो वजनाची अतिज्वालाग्राही (हाय एक्स्प्लोझिव्ह) स्फोटके भरलेली असत. केवळ काही सेकंदांत ही १६ रॉकेट्स ८५०० मीटपर्यंत एकत्र मारा करत असत. अशा ४ लाँचर्सच्या बॅटरीने केवळ ७ ते १० सेकंदांत शत्रूवर ४.३५ टन अतिज्वालाग्राही स्फोटके डागता येत. त्यांनी शेकडो चौरस मीटर क्षेत्रात विनाश होत असे. त्यांचा मारा तोफांच्या ७२ बॅटरीजच्या (१ बॅटरी म्हणजे ६ ते ८ तोफा) माऱ्याच्या बरोबरीचा असे.

या माऱ्यामुळे जर्मन सैनिकांनी घाबरून कात्युशाला ‘स्टालिन्स ऑर्गन’ असे नाव ठेवले होते. येथे ऑर्गनचा अर्थ अवयव असा नसून चर्चमध्ये ठेवले जाणारे मोठे वाद्य असा आहे. त्यातून जसा शीळ घातल्यासारखा मोठा आवाज येतो तसाच कात्युशा रॉकेट डागल्यावर येत असे.  सोव्हिएत रशियाचा सर्वेसर्वा जोसेफ स्टालिनचे आवाजी हत्यार असे त्यात अभिप्रेत होते.

इतक्या घातक शस्त्राला कात्युशा हे नाव कसे पडले याची कहाणीही रंजक आहे. या शस्त्राविषयी गुप्तता बाळगण्यासाठी रशियाने त्याला ज्या कारखान्यात तयार केले जात होते त्यावरून केवळ ‘के’ असे नाव दिले होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान रशियन सैनिकांमध्ये कात्युशा नावाचे गाणे प्रसिद्ध होते. या गाण्यात कात्युशा नावाची एक मुलगी दूर सीमेवर युद्धावर गेलेल्या तिच्या प्रियकराच्या आठवणी नदीच्या तीरावर बसून जागवत असते. तो सैनिक जसा देशाशी निष्ठावान राहून मातृभूमीचे रक्षण करत असतो तशीच कात्युशाही त्याच्याशी प्रामाणिक असते आणि त्यांच्या प्रेमाला जपत असते, असा साधारण गाण्याचा आशय आहे.

आपण जसे सचिनचे सच्या करतो, तसेच रशियातही आपलेपणाने नावांचे मूळ रूप बदलण्याची पद्धत आहे. त्यात आंद्रेईचे आंद्रुशा होते आणि कॅथरीन किंवा कतरिनाचे कात्युशा होते. अमेरिकेत कतरिनाचे कॅटी केले जाते, तसाच हा प्रकार. त्यामुळे रशियन सैनिकांनी प्रेमाने या रॉकेटला कात्युशा असे नाव दिले आणि आजवर त्या प्रकारच्या रशियन रॉकेट लाँचर्सना हेच नाव चिकटले आहे.

– सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com