सुरुवातीच्या शस्त्रांमध्ये गदा, कुऱ्हाड किंवा परशु यांसारखी साधी पण प्रभावी शस्त्रे वापरात होती. या काळातील बरीच शस्त्रे शेतीच्या साध्या औजारांपासून विकसित झाली होती. ‘क्लब’ (club) हे यातील अगदी साधे आणि मूलभूत शस्त्रे. मुठीकडे निमुळता आणि टोकाला जाड असणारा साधा दंडुका किंवा सोटा म्हणजे क्लब. गदेचा हा अगदी सुरुवातीचा अवतार. पुढे त्याला समोरच्या जाडसर भागावर टोकदार खिळे बसवून अधिक घातक केले गेले. प्राथमिक अवस्थेत ही लाकडाची शस्त्रे होती.
जसा धातूंचा शोध लागला तशा धातूच्या गदा अस्तित्वात आल्या. या गदा आपण दूरदर्शनवर रामायण-महाभारत मालिकांमध्ये पाहिल्या तितक्या मोठय़ा नसत. पुढील गोलाकार भाग बराच लहान असे. गदेचाच थोडा विकसित अवतार म्हणजे ‘मेस’(mace). भारतात मराठय़ांच्या काळात त्याला ‘गुर्ज’ म्हणत. त्याच्या रचनेच थोडे बदल करून अनेक प्रकार विकसित झाले. लाकडी किंवा धातूच्या काठीला पुढे धातूचा साधा गोळा बसवलेली गदा किंवा मेस असे. पुढील धातूच्या गोळ्याला टोके असतील तर त्याला ‘स्पाइक्ड मेस’ म्हणत. हातात धरण्यासाठी धातूची काठी, त्याला साखळी आणि पुढे धातूचा साधा किंवा टोकांचा गोळा अशा शस्त्राला ‘आर्टिक्युलेटेड स्पाइक्ड मेस’ म्हणत. धातूच्या काठीला पुढे ताक घुसळण्याच्या रवीसारखी गोलाकार पाती असल्यास त्याला गुर्ज किंवा ‘फ्लँग्ड मेस’ (flanged mace) म्हणत.
शेतीच्या औजारापासून विकसित झालेले आणखी एक शस्त्र म्हणजे फ्लेल (flail). यात लाकडी लांब काठीला पुढे छोटी साखळी आणि त्याला छोटा दंडुका किंवा धातूची लहान चपटी पट्टी लावलेली असे. हे औजार प्रामुख्याने मक्याच्या कणसांची मळणी करण्यासाठी वापरले जायचे. पूर्वीच्या काळात वर्षभर शेती शक्य नसे. युद्धकाळात शेतकरीच सैनिक बनत. अशा वेळी फ्लेल युद्धात शस्त्र म्हणून वापरले जाई. तसेच हातोडा हेही शस्त्र म्हणून वापरले जाई. हातोडय़ाच्या टोकाला एका बाजूला बोथट भाग दुसऱ्या बाजूला टोकदार भाग असे करून वापरले जाई. हे शस्त्र चिलखतातील धातूचे पत्रे भेदण्यासाठी उपयुक्त होते.
कुऱ्हाडीचे अनेक प्रकारही शस्त्र म्हणून वापरले गेले. त्यातील परशु भारतीयांना चांगलाच माहित आहे. पूर्वी रामोशी जमातीकडून वापरल्या जाणाऱ्या फरशी या कुऱ्हाडी साधारण त्याच प्रकारच्या. कुऱ्हाडीच्या पात्याच्या रचनेत काही बदल करून तिचा विविध कामांसाठी वापर होत असे. पाते जमिनीकडे थोडे लांबलेले असेल तर त्याचा हूकसारखा वापर करून शत्रूच्या हातातील शस्त्र ओढून घेता येत असे. पात्याला वर भाल्यासारखे टोक असेल त्याचा खुपसण्यासाठीही वापर होई. कुऱ्हाड फेकून मारण्यासाठीही उपयोगी हत्यार आहे. उत्तर अमेरिकेतील स्थानिक इंडियन आदिवासी टोळ्यांमध्ये टॉमहॉक (किंवा टोमाहॉक) नावाची कुऱ्हाड वापरात होती. (आता या नावाचे अमेरिकेचे क्रूझ क्षेपणास्त्र आहे.) यातील बरीच शस्त्रे चिलखत भेदण्यासाठी वापरली जात. फेकून मारण्याच्या शस्त्रांत भारतात चक्र हा प्रकार प्रचलित होता. खासकरून शीख योद्धे त्याचा वापर करीत. बाहेरून धारदार असलेल्या धातूच्या चकत्या बोटात फिरवून वेगाने फेकल्यावर त्या प्रसंगी शस्त्रूचा शिरच्छेदही करू शकत. बुमरँग हे प्राथमिकरीत्या शिकारीसाठीचे हत्यार. ते फेकून मारल्यास परत येते. युद्धात वापरली जाणारी बुमरँग मात्र परत येत नसत.
सचिन दिवाण
sachin.diwan@expressindia.com