सुरुवातीच्या आक्र्विबसपासून आजच्या आधुनिक बंदुकांपर्यंतच्या प्रवासात मधले काही टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. त्यात मॅचलॉक, व्हिललॉक, फ्लिटलॉक, पर्कशन कॅप आणि काडतूस यांच्या विकासाचा समावेश आहे. तसेच बंदुकीत दारू आणि गोळी भरण्याची प्रक्रियाही बदलत गेली. त्यात ठासणीच्या पद्धतीकडून म्हणजे मझल लोडिंगपासून बंदुकीच्या मागील खाचेतून गोळ्या भरण्यापर्यंत (ब्रिच लोडिंग) झालेले स्थित्यंतर महत्त्वाचे आहे. तसेच बंदुकीच्या नळीचा आतील पृष्ठभाग गुळगुळीत असण्याकडून (स्मूथ बोअर) त्यावर सर्पिलाकार आटे पाडणे (रायफलिंग) हा प्रवासही बंदुकीच्या विकासाला मोठय़ा प्रमाणात हातभार लावणारा होता. या सर्व सुधारणा १५व्या, १६ व्या आणि १७ व्या शतकात हळूहळू, वेगवेगळ्या ठिकाणी होत गेल्या.
आक्र्विबसमध्ये गनपावडर आणि गोळी भरून डागताना सैनिकाचे बरेचसे लक्ष शत्रूवर राहण्याऐवजी त्याच्या स्वत:च्या शस्त्रावरच केंद्रित होत असे. बंदुकीत बार भरून त्याला बत्ती देण्यासाठी एक लांब दोरी किंवा वात पेटवली जात असे. ती बत्ती देण्याच्या छिद्रावर टेकवली जात असे. हे करताना सैनिकाचे शत्रूवरील लक्ष हटत असे आणि नेम धरताना एकाग्रता होत नसे.
त्यावर उपाय म्हणून नवा मार्ग शोधला गेला. पेटती वात हाताने धरून बत्ती देण्याऐवजी ती बंदुकीच्या बाजूला एका आकडय़ासारख्या (हूक) भागाने धरून ठेवली जाण्याची सोय केली गेली. त्यामुळे सैनिकांचे दोन्ही हात बंदूक पकडण्याठी मोकळे झाले. तसेच बंदुकीत बार भरल्यानंतर (लोड करणे) बत्ती देण्याच्या (फायर करणे) क्रियेपर्यंत शत्रूवर नेम धरण्यास उसंत मिळू लागली. याच काळात बंदुकीचा चाप किंवा ट्रिगर तयार झाला. हा चाप दाबला असता पेटती वात धरलेला हूक खाली येऊन बत्ती देण्याच्या छिद्रावर टेकत असे. आता त्या जागेला पॅन म्हटले जात होते. तेथील दारू पेट घेऊन नळीतील म्हणजे फायरिंग चेंबरमधील दारूचा स्फोट होत असे. त्याच्या दावाने गोळी बंदुकीच्या नळीतून (बॅरलमधून) बाहेर सुटत असे. या यंत्रणेला मॅच-लॉक सिस्टम म्हटले जात असे. तर या पद्धतीच्या बंदुका मॅचलॉक मस्कट म्हणून प्रसिद्ध होत्या.
एक गोळी डागल्यानंतर बॅरलच्या आतील पृष्ठभागावर काजळी साठत असे. ती काढण्यासाठी आणि नवी दारू आणि गोळी भरून ठासण्यासाठी रॅम-रॉड म्हणून ओळखली जाणारी लांब लोखंडी सळईही बंदुकीबरोबर दिलेली असे. प्रथम थोडी गनपावडर पॅनमध्ये सोडली जायची. नंतर उरलेली पावडर बंदुकीच्या पुढल्या भागातून नळीत ओतली जायची. त्यावर गोळी सोडली जायची. नंतर हे सगळे मिश्रण सळईने (रॅम-रॉड) ठासून भरली जायची. नंतर नेम धरून चाप ओढला जायचा. ही सगळी प्रक्रिया वेळखाऊ होती. त्यामुळे अगदी निष्णात सैनिक एका मिनिटात साधारण तीन गोळ्या डागू शकत असत. या गोळ्यांचा पल्ला बऱ्यापैकी असला तरी साधारण ५० यार्डाच्या पलीकडे त्यांचा नेम फारसा चांगला नसे आणि त्यांची परिणामकारकताही ओसरत असे.
तरीही मॅचलॉक मस्केटने युद्धभूमीवर क्रांती घडवली होती. आधीच्या बेभरवशाच्या गोळीबारात आता थोडी शिस्त आली होती. युरोपीय देशांनी त्यांच्या कवायती फौजांमध्ये या बंदुकांचा मोठय़ा प्रमाणात समावेश केला. या बंदुकांच्या गोळ्या कमी अंतरावरच्या हल्ल्यात चिलखत भेदत असत. त्याने चिलखत आणि घोडदळाचे दिवस भरले होते. त्याने जुने युद्धतंत्रही मोडीत निघाले. यामुळे युरोपच्या जगातील वर्चस्वाला सुरुवात झाली.
सचिन दिवाण
sachin.diwan@expressindia.com