दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश सैन्याने १९५४ साली स्वीकारलेली एफएन-एफएएल (Fabrique Nationale – Fusil Automatique Leger) ही बंदूक जगभर गाजली ती एसएलआर किंवा सेल्फ-लोडिंग रायफल म्हणून. बेल्जियममधील फॅब्रिक नॅशनल या कंपनीचे हे मूळ रायफलचे डिझाइन आजवरचे सर्वात यशस्वी मॉडेल म्हणून गणले जाते. ब्रिटनसह नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो)मधील अनेक देशांत तिचा वापर होत असल्याने ‘राइट आर्म ऑफ द फ्री वर्ल्ड’ अशी या रायफलची ख्याती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरच्या ९० देशांच्या सेनादलांनी तिच्या विविध आवृत्ती स्वीकारल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आजही त्या वापरात आहेत. अरब आणि इस्रायल यांच्यात १९६७ साली झालेल्या युद्धात (सिक्स डे वॉर) इस्रायली सैन्याला झंझावाती विजय मिळवून देण्यात त्यांच्या सुप्रसिद्ध उझी सब-मशिनगनचा सिंहाचा वाटा असल्याचे सामान्यत: मानले जाते. पण प्रत्यक्षात सिक्स डे वॉर आणि त्यापुढील १९७३ च्या योम किप्पूर युद्धातही इस्रायली सैन्याची प्रमुख बंदूक होती ती एफएन-एफएएल रायफल. युद्धात दोन्ही पक्षांकडून एकच शस्त्र वापरले जाण्याचे उदाहरण तसे विरळा. पण १९८२ साली अटलांटिक महासागरातील फॉकलंड (माल्विना) बेटांच्या मालकीवरून झालेल्या युद्धात ब्रिटिश आणि अर्जेटिना अशा दोन्ही सैन्याकडे एफएन-एफएएल रायफलच होत्या. भारतीय लष्कराकडेही याच बंदुका होत्या आणि अजूनही भारतातील अनेक राज्यांच्या पोलीस दलांकडे त्याच रायफल वापरात आहेत. भारतात ईशापूर रायफल फॅक्टरीत त्यांचे उत्पादन होत असे.

एफएन-एफएएल रायफल सुरुवातीला .२८० कॅलिबरचे ब्रिटिश इंटरमिजिएट नावाचे काडतूस वापरण्यासाठी डिझाइन केली होती. पण नंतर तिच्यात नाटो सैन्याकडून वापरले जाणारे ७.६२ मिमी व्यासाचे आणि ५१ मिमी लांबीचे काडतूस वापरण्याचे ठरले. त्यामुळे एफएन-एफएएल रायफलचे डिझाइन तिच्या अंतिम मर्यादेपर्यंत ताणले गेल्यासारखे वाटते. ब्रिटनमध्ये ही रायफल एल १ ए १ सेल्फ लोडिंग रायफल म्हणून ओळखली गेली. तिच्या मॅगझिनमध्ये २० गोळ्या मावतात आणि त्यांचा ८०० मीटपर्यंत अचूक मारा करता येतो.

तिची गोळी बरीच शक्तिशाली आहे. ती झाडल्यावर चेंबरमध्ये मोठा स्फोट होतो आणि बराच धक्का बसतो. याच कारणामुळे ही बंदूक एकेक गोळी झाडण्यासाठी किंवा सेमी-ऑटोमॅटिक मोडमध्ये वापरण्यास अधिक सुलभ आहे. ती फुल-ऑटोमॅटिक मोडमध्ये वापरली तर फारशी नियंत्रणात राहत नाही आणि गोळ्या नेम धरून मारणे अवघड होते. म्हणून ब्रिटिश लष्कराने तिची सेमी-ऑटोमॅटिक आवृत्तीच स्वीकारली आहे. फुल ऑटोमॅटिक मोडमध्ये तिचा मारा अधिक अचूक करण्यासाठी रायफलचे बॅरल अधिक जड केले गेले आणि ती दोन पायांच्या स्टँडवर बसवून वापरली गेली.

एफएन-एफएएल काही असॉल्ट रायफल नव्हती. तरीही शीतयुद्धाच्या काळातील तिची कामगिरी निर्विवाद राहिली. त्यानेच तिची ‘राइट आर्म ऑफ द फ्री वर्ल्ड’ ही बिरुदावली सार्थ ठरवली.

सचिन दिवाण ; sachin.diwan@ expressindia.com