जून १९४१ मध्ये ‘ऑपरेशन बार्बारोझा’ची सुरुवात करून हिटलरने रशियात मॉस्कोपर्यंत मुसंडी मारली होती. रशियानेही ‘दग्धभू धोरण’ (स्कॉच्र्ड अर्थ पॉलिसी) स्वीकारून जर्मनांना आत येऊ दिले. पण रशियन थंडी सुरू झाल्यावर जर्मन सैन्याची धडगत लागत नव्हती. हळूहळू रशियन प्रतिकाराला धार प्राप्त होऊ लागली. १९४२ आणि १९४३ साली स्टालिनग्राड आणि कस्र्क येथे झालेल्या संघर्षांनी युद्धाचे पारडे फिरवण्यास सुरुवात केली. त्यातील कस्र्क येथील संग्राम जगातील आजवरची रणगाडय़ांची सर्वात मोठी लढाई म्हणून ओळखली जाते. त्यात रशियन जनरल जॉर्जी झुकॉव्ह यांच्या नेतृत्वाखालील रेड आर्मीने जर्मनांना मात देत आक्रमण परतवण्यास सुरुवात केली. तेथून जर्मन सैन्याच्या मागावर लागलेली रशियन सेना थेट बर्लिनच्या ब्रॅडेनबर्ग गेट आणि हिटलरच्या चॅन्सेलरीपर्यंत मजल मारूनच थांबली.
रशियाच्या या यशात सिंहाचा वाटा होता तो टी-३४ रणगाडय़ांचा. जर्मनीचे जनरल हाइन्झ गुडेरियन हे पँझर रणगाडय़ांनीशी फ्रान्स पादाक्रांत करणारे नावाजलेले सेनानी. त्यांना ‘पँझर जनरल’ म्हणूनच ओळखले जाते. पण त्यांच्या पँझर रणगाडय़ांची जेव्हा रशियन भूमीत टी-३४ रणगाडय़ांशी गाठ पडली तेव्हा त्यांचे गर्वहरण झाले. टी-३४ इतके प्रभावी होते की गुडेरियन यांनी म्हटले होते, त्यांचा मुकाबला करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जर्मनीने त्वरित त्यांची नक्कल (कॉपी) करणे!
रशियन जनरल जॉर्जी झुकॉव्ह तत्पूर्वी १९३९ साली खाल्खिन गोल नदीच्या परिसरात जपानशी झालेल्या युद्धात लढले होते. तेव्हा जपानचे रणगाडे रशियन रणगाडय़ांपेक्षा वरचढ ठरले होते. त्यातून धडा घेऊन सोव्हिएत युनियनचे नेते जोसेफ स्टालिन यांनी प्रभावी रणगाडा तयार करण्याचे आदेश दिले. त्याला प्रतिसाद देऊन मिखाइल कोश्किन या गुणी डिझायनरने टी-३४ रणगाडय़ाची रचना केली. पण दुर्दैव असे की १९४० मध्ये टी-३४ च्या चाचण्या सुरू असताना कोश्किन यांना न्यूमोनिया झाला. सप्टेंबर १९४० मध्ये टी-३४ चे उत्पादन सुरू झाले आणि त्याच महिन्यात कोश्किन यांचा मृत्यू झाला.
जर्मन आक्रमणाच्या मार्गात येणारे कारखाने रशियाने उरल पर्वतराजींच्या पूर्वेला नेले आणि टी-३४ चे उत्पादन सुरू ठेवले. या रणगाडय़ाची खासियत म्हणजे साधे, सुटसुटीत, उत्पादनाला सोपे पण अत्यंत मजबूत आणि प्रभावी डिझाइन. त्याच्या रचनेत प्रथमच तिरप्या चिलखताचा (स्लोप्ड आर्मर) वापर केला होता. त्याने चिलखताची जाडी वाढते आणि शत्रूचे तोफगोळे बाजूला वळवले जातात. नंतर सर्वच देशांनी ही पद्धत अंगीकारली. याचे चिलखत साधारण ६० मिमी जाडीचे होते. त्यावर ७६.२ मिमी व्यासाची दमदार तोफ होती. नंतर सुधारित टी-३४/८५ या आवृत्तीत आणखी शक्तिशाली ८५ मिमी व्यासाची तोफ बसवली गेली आणि चिलखत ९० मिमी जाड केले. ती १००० मीटर अंतरावरून जर्मनीचे सर्वोत्तम पँथर आणि टायगर रणगाडे फोडू शकत असे. या रणगाडय़ात इंधन म्हणून पेट्रोलऐवजी डिझेलचा वापर केला होता. बॉम्बहल्ल्याने पेट्रोल लवकर पेटते. डिझेलला पेट घेण्यास वेळ लागतो. तेवढय़ा वेळेत सैनिक बाहेर पडू शकतात. टी-३४ ताशी ४० किमी वेगाने एका दमात ४३० किमी तर टी-३४/८५ ताशी ५५ किमी वेगाने एका दमात ३०० किमी अंतर पार करत असे. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उत्पादन झालेला (८० हजार हून अधिक) रणगाडा आहे. रशियन टी-३४ रणगाडा
sachin.diwan@ expressindia.com