पिस्टन इंजिनावर चालणाऱ्या आणि प्रोपेलर असलेल्या विमानांच्या मर्यादा दुसऱ्या महायुद्धापर्यंत जाणवू लागल्या होत्या. अधिक वेग, उंची, पल्ला आणि वहनक्षमता मिळवण्यासाठी विमानाला गती देणाऱ्या नव्या पद्धतीची (प्रॉपल्शन सिस्टीम) गरज होती. त्या दृष्टीने १९३०च्या दशकात ब्रिटनमध्ये फ्रँक व्हिटल आणि जर्मनीमध्ये हान्स-लोआचिम पाब्स्ट फॉन ओहाइन यांनी स्वतंत्रपणे जेट इंजिन विकसित करण्यास सुरुवात केली होती. त्याच दरम्यान इटलीमध्ये सेकंदो कँपिनी हे जेट इंजिनवर काम करत होते.
यापैकी व्हिटल यांनी प्रथम जेट इंजिनचे पेटंट घेतले. पण त्यावर आधारित विमान विकसित करण्यात ब्रिटनने सुरुवातीला फारसा रस घेतला नाही. जोपर्यंत ब्रिटनने जेट इंजिनावर आधारित ग्लॉस्टर मिटिऑर हे विमान विकसित केले तोपर्यंत जर्मनीने या क्षेत्रात आघाडी घेतली होती. जर्मनीत ओहाइन यांना विमाननिर्माते अर्न्स्ट हाइन्केल यांनी मदत केली. त्यातून ऑगस्ट १९३९ मध्ये हाइन्केल एचई-१७८ या पहिल्या जेट इंजिनावर आधारित विमानाचे उड्डाण झाले. मात्र ते फारसे आश्वासक नव्हते. तो प्रकल्प बारगळला आणि हे विमान बर्लिनच्या संग्रहालयात ठेवले गेले. तेथे १९४३ साली झालेल्या हवाई हल्ल्यात ते नष्ट झाले.
दरम्यान जर्मनीतील युंकर्स आणि बीएमडब्ल्यू या कंपन्यांनी युमो ००४ आणि बीएमडब्ल्यू ००३ ही जेट इंजिने बनवली होती. जेट इंजिनमध्ये मोठय़ा गोलाकार फिरत्या पंख्यांच्या मदतीने हवा आत खेचून घेतली जाते. नंतर हवा कॉम्प्रेसरच्या मदतीने दाबली जाते आणि त्यात इंधन मिसळून त्याचे ज्वलन केले जाते. त्याने गरम झालेले वायू जेट नोझल किंवा एक्झॉस्टमधून वेगाने बाहेर फेकले जातात. ते विमानाला पुढे ढकलून गती देतात. न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमानुसार (क्रिया आणि प्रतिक्रिया) जेट इंजिनाचे काम चालते.
विली मेसरश्मिट यांच्या कंपनीला सुरुवातीला बीएमडब्ल्यू ००३ या टबरेजेट इंजिनावर आधारित लढाऊ विमान बनवण्याचे कंत्राट १९३८ साली देण्यात आले. त्यातून मेसरश्मिट एमई-२६२ हे पहिले जेट इंजिनावर आधारित लढाऊ विमान तयार झाले. त्याची पहिली यशस्वी चाचणी १८ जुलै १९४२ रोजी घेण्यात आली. एमई-२६२ ए-१ए या मॉडेलवर युंकर्स युमो ००४ बी १ प्रकारची दोन जेट इंजिने बसवली होती. त्याचा वेग ताशी ८६० किमी इतका, म्हणजे मित्रदेशांच्या कोणत्याही विमानापेक्षा १०० ते २०० किमीने अधिक होता. त्याचा पल्ला ११५० किमी होता. ते ११,४५० मीटर (३७,५६६ फूट) उंची गाठू शकत असे. त्यावर ३० मिमी व्यासाच्या ४ कॅनन आणि आर ४ एम ओक्रान प्रकारची २४ रॉकेट्स डागण्याची सोय होती.
दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस ही विमाने वापरात आली तेव्हा मित्रराष्ट्रांचे वैमानिक त्याच्या वेगाने अवाक झाले. या विमानात युद्धाचे पारडे पुन्हा जर्मनीच्या बाजूने फिरवण्याची क्षमता होती. मात्र त्याच्या आगमनाला उशीर झाला होता. तसेच ते एक उत्तम फायटर विमान असताना हिटलरने ते बॉम्बरच्या भूमिकेत वापरण्याची चूक केली. जर्मनीने साधारण १४०० एमई-२६२ तयार केली होती. त्यापैकी केवळ ३००च्या आसपास विमानेच प्रत्यक्ष युद्धात वापरली गेली. त्यांनीही शत्रूची सुमारे ७०० विमाने पाडली. एमई-२६२ मध्ये प्रथमच फ्यूजलाजशी काही अंशात मागे वळलेले पंख (स्वेप्ट बॅक विंग्ज) वापरले गेले. तीच रचना पुढे अमेरिकी एफ-८६ सेबर आणि सोव्हिएत युनियनच्या मिग-१५ विमानांमध्ये वापरली गेली. एमई-२६२ विमानाने जेट युगाची नांदी केली.
sachin.diwan@ expressindia.com