सोव्हिएत रशियाची एके-४७ असॉल्ट रायफल जगभरात गाजली असली तरी तिची पूर्वज म्हणून जिला ओळखता येईल ती जर्मन श्टुर्मगेवेर-४४ (एसटीजी ४४ – Sturmgewehr 44) रायफल मात्र फारशी प्रकाशझोतात आली नाही. किंबहुना त्यानंतर वापरात आलेल्या एके-४७ च्या झगमागाटात ‘एसटीजी-४४’ झाकोळून गेली आणि इतिहासाने तिला पुरेसा न्याय दिला नाही.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातील जर्मनीने सोव्हिएत युनियनच्या सैनिकांकडून काबीज केलेल्या टोकारेव्ह एसव्हीटी- ३८ आणि ४० या रायफलवरून जर्मनांनी गॅस-ऑपरेटेड सिस्टिम अधिक प्रभावी बनवली आणि जर्मन गेवेर ४१, ४२  आणि ४३ या रायफल विकसित झाल्या. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या पूर्व आघाडीवर आलेल्या अनुभवानंतर जर्मन सैन्याला नव्या मशिन-कार्बाइनची गरज भासू लागली. त्यासाठी हाएनेल आणि वॉल्थेर या बंदूक डिझायनर्सना गरजेप्रमाणे निकष सांगण्यात आले. त्यानुसार दोघांनीही गॅस-ऑपरेटेड बंदुकीची दोन प्रारूपे तयार केली आणि ती विलक्षण समान होती. दोन्हींमध्ये सरळ दस्ता (बट), गॅस-ऑपरेशन प्रणाली, पिस्टल ग्रिप आणि ३० गोळ्याचे वक्राकार बॉक्स मॅगझिन होते. हाएनेल यांच्या बंदुकीचे नाव मशिनकार्बिनर ४२ (एच) किंवा एमकेबी४२ (एच) असे होते. तर वॉल्थेरने त्यांचा बंदुकीला एमकेबी ४२ (डब्ल्यू) असे नाव दिले होते. दोन्ही प्रारूपे प्लास्टिक आणि हलके मित्रधातू वापरून लवकर उत्पादित करता येतील अशा बेताने बनवली होती. जर्मन सैन्याने त्यातील एमकेबी४२ (एच) डिझाइन निवडले आणि त्याचे उत्पादन करून तशा ८००० रायफल पूर्वेकडील आघाडीवर पाठवल्या. तेथे त्या प्रभावीही ठरल्या. पण अ‍ॅडॉल्फ हिटलरने अचानक असॉल्ट रायफलचा पुढिल विकास थांबवण्याच्या आज्ञा दिल्या. हिटलर स्वत: पहिल्या महायुद्धात लढला होता आणि त्या अनुभवानुसार त्याच्या रायफलविषयी ठराविक कल्पना होत्या. त्या बहुतांशी बदललेल्या काळाच्या मागे होत्या. पहिल्या महायुद्धावेळी रायफलचा पल्ला साधारण ८०० मीटरच्या आसपास असायचा. पण दुसऱ्या महायुद्धापर्यंत त्यापेक्षा कमी म्हणजे ४०० मीटरच्या अंतरात पायदळाचे हल्ले होत होते. त्यामुळे इतक्या दीर्घ पल्ल्याची गरज नव्हती. पण हिटलरला हे पटवणे ेअवघड होते. शेवटी जर्मन सैन्याले शक्कल लढवली. दरम्यानच्या काळात हाएनेलने त्यांच्या एमकेबी ४२ (एच) या बंदुकीच्या सुधारित डिझाइनचे नाव एमपी-४३ असे बदलले होते. आता ही बंदूक असॉल्ट रायफलऐवजी मशिननपिस्टोल किंवा सब-मशिनगन या वर्गवारीत मोडत होती. कागदोपत्रीही या बंदुकीचे नाव बदलून टाकले. तिचे प्रात्यक्षिक हिटलरला दाखवल्यानंतर तो चांगलाच प्रभावित झाला आणि एमपी-४३ च्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला. हिटलरने मोठय़ा हौसेने तिचे नामकरण श्टुर्मगेवेर-४४ असे केले. जर्मन भाषेत श्टुर्मगेवेर म्हणजे असॉल्ट रायफल असाच अर्थ होतो. ही रायफल मिनिटाला ५०० च्या वेगाने गोळ्या झाडत असे. तिने दुसऱ्या महायुद्धात जर्मनांना चांगलाच हात दिला.

sachin.diwan@expressindia.com

Story img Loader