काही शस्त्रे आणि त्यांचा वापर करणारे योद्धे यांच्यातील द्वैत संपून अद्वैत निर्माण झालेले असते. जपानचे ‘सामुराई’ योद्धे आणि त्यांच्या ‘कटाना’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तलवारी यांचे नातेही असेच आहे.
जपानमधील सामुराई हे जगातील अत्यंत कुशल आणि जोशयुक्त योद्धय़ांपैकी एक म्हणून नावाजले जातात. त्यांच्या कटाना या लांब आणि काहीशा बाकदार तलवारी प्रसिद्ध आहेत. त्यासह तशाच पण लांबीने थोडय़ा लहान वाकिझाशी नावाच्या तलवारीही बाळगल्या जात. मात्र काही अभ्यासकांच्या मते कटाना किंवा वाकिझाशी ही सामुराईंची प्राथमिक शस्त्रे नव्हती. ते मूलत: अश्वारूढ सैनिक होते आणि धनुष्य-बाणांचा तसेच भाल्यांचा वापर करत. अगदी समोरासमोरील अटीतटीच्या लढतीत कटानाचा वापर होत असे.
सामुराईंसाठी कटाना हे नुसते एक शस्त्र नाही तर त्यांच्या शरीराचे एक अंग आहे. या तलवारीला जपानी संस्कृतीत सर्वोच्च मानाचे स्थान आहे. सामुराई योद्धा आयुष्यात कधीही कटानाला अंतर देत नाही. त्याच्या झोपेच्या वेळीही कटाना त्याच्या उशाशी असते. असे म्हणतात ही सामुराईच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत त्याच्या कटानाचेही अंत्यसंस्कार केले जातात.
कटाना तलवार तिच्या आकार आणि रचनमुळे अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. तिच्या पोलादाचा दर्जा अत्यंत उच्च असतो. तसेच हे अत्यंत धारदार, तुलनेने हलके आणि सफाईदार शस्त्र आहे. त्यामुळे युरोपीय बनावटीच्या लाँगस्वोर्डचा जितक्या वेळेत एक वार होतो तितक्या वेळेत कटानाचे तीन वार झालेले असतात. कटानाची धार आणि कापण्याची क्षमता अजोड आहे. त्यामागचे रहस्य कटानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत आहे.
सामुराईंसाठी कटाना तलवारी तयार करणे हे जपानमध्ये अत्यंत पवित्र काम मानले जाते. त्यासाठी पिढीजात खास लोहार आहेत आणि त्यांना धर्मगुरूंच्या दर्जाचा सन्मान दिला जातो. जपानमध्ये साधारण तेराव्या-चौदाव्या शतकात सोशु परंपरेत मासामुन नावाचा सवरेत्कृष्ट तलवारनिर्माता होऊन गेला. त्याने ताची प्रकारच्या तलवारी आणि तांतो प्रकारच्या कटय़ारी बनवल्या. त्या आजतागायत प्रसिद्ध आहेत. मासामुनच्या नावाने जपानमध्ये आजही तलवारबाजीच्या स्पर्धा होतात आणि त्याच्या नावाने मोठा पुरस्कार दिला जातो. कटानाची निर्मिती सुरू करण्यापूर्वी भगवान बुद्धांची प्रार्थना केली जाते. खास श्लोक म्हणून भात्यातील अग्नी प्रज्वलित केला जातो. कटानानिर्मितीचे काम अनेक दिवस चालते. या काळात हे लोहार धर्मगुरूंप्रमाणे शुद्ध आचरण ठेवतात. मांसाहार, मद्य, लैंगिक संबंध वर्ज्य मानले जातात.
कटानासाठी अत्यंत दर्जेदार लोखंड व पोलादाचा वापर केला जातो. मध्य भागात मऊ लोखंड आणि बाहेर कठीण लोखंड वापरले जाते. अशा मऊ आणि कठीण लोखंडाच्या तुकडय़ांना एकत्र ठेवून भट्टीत तापवून वेळोवेळी त्याच्या घडय़ा घातल्या जातात. पुन्हा तापवले आणि हातोडय़ाने ठोकले जाते. हळूहळू मऊ आणि कठीण लोखंडाचा एकत्र केलेला ठोकळा लांब तलवारीचे रूप घेऊ लागतो. असे थरावर थर दिलेली तलवार जेव्हा तयार होऊन, तिला धार लावून झिलई दिली जाते (पॉलिश करणे) तेव्हा तिच्या धार असलेल्या बाजूवर नागमोडी रेषा उमटते. त्यात आतील मऊ आणि कठीण लोखंडाचे थर दिसून येतात. बाहेरील कठीण थर कापण्याची उच्च क्षमता प्रदान करतो तर आतील मऊ लोखंडाचा थर धक्के शोषून घेण्याच्या कामी येतो. यावर अंतिम कोरीव नक्षीकाम केले जाते, खास म्यान बनवले जाते आणि तयार कटाना भक्तिभावाने सामुराई योद्धय़ांकडे सुपूर्द केली जाते. तिच्या धारेवर केवळ योद्धय़ाची जीवनरेखा नव्हे तर जपानची आणि सामुराई परंपरेची शानही अवलंबून असते.
सचिन दिवाण – sachin.diwan@ expressindia.com