अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर ६ आणि ९ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकले आणि दुसऱ्या महायुद्धाची सांगता झाली. जग अमेरिका आणि सोव्हिएत युनियन अशा दोन गटांत विभागून शीतयुद्ध सुरू झाले. त्या दरम्यान दोन्ही गटांतील देशांनी अण्वस्त्रे आणि ती डागण्यासाठी विविध पद्धतींचा शोध घेतला. अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब अशी मोठमोठी अण्वस्त्रे बनवली गेली. तसेच त्यांना शत्रूप्रदेशात टाकण्यासाठी विमाने, क्षेपणास्त्रे, तोफा इतकेच नव्हे तर भूसुरुंगही बनवले गेले. हिरोशिमावरील हल्ल्यानंतर केवळ आठ वर्षांत शास्त्रज्ञांना तोफेतून डागता येण्यासारखी अण्वस्त्रे बनवण्यात यश आले. त्यानंतर तीन वर्षांत ही अण्वस्त्रे इतकी लहान बनवली गेली की ती १५५ मिमी व्यासाच्या तोफेतून डागता येऊ लागली. त्यातून टॅक्टिकल न्यूक्लिअर आर्टिलरीचा (डावपेचात्मक आण्विक तोफखाना) जन्म झाला.

अमेरिकी लष्कराच्या आर्टिलरी टेस्ट युनिटने २५ मे १९५३ रोजी ओक्लाहोमामधील पोर्ट सिल येथे तयार केलेल्या ‘अ‍ॅटॉमिक अ‍ॅनी’ नावाच्या महाकाय तोफेची नेवाडातील वाळवंटात चाचणी घेतली. या तोफेच्या बॅरलचा व्यास २८० मिमी इतका होता. त्यातून २८ सेंमी. (११ इंच) व्यासाचा अण्वस्त्रयुक्त तोफगोळा १० किलोमीटर इतक्या दूरवर डागण्यात यश आले.  त्याचा जमिनीपासून १६० मीटर उंचीवर स्फोट झाला. त्याची क्षमता १५ किलोटन इतकी होती. या चाचणीचे सांकेतिक नाव होते ‘शॉट ग्रॅबल’ आणि ती ‘ऑपरेशन अपशॉट नॉटहोल’ या प्रकल्पाचा एक भाग होती. १९५३ ते १९९० दरम्यान अमेरिकेने अनेक प्रकारची तोफेतून डागण्यायोग्य अण्वस्त्रे बनवली. सोव्हिएत युनियनने लहान अण्वस्त्रे डागण्यासाठी ‘२ बी १ ओका’ किंवा ‘ट्रान्सफॉर्मर’ नावाचा सेल्फ-प्रोपेल्ड  मॉर्टर बनवला होता. अन्य देशांनीही अशीच शस्त्रे विकसित केली.

मात्र १९९० पर्यंत दोन्ही गटांतील देशांना या सगळ्या प्रकारातील फोलपणा लक्षात आला होता. कोणीही अगदी तोफांतून लहान अण्वस्त्रेही डागली तरी युद्ध तेवढय़ावर मर्यादित राहणार नाही. त्यातून अधिक संहारक अण्वस्त्रांचा वापर होऊन सर्वनाश ओढवणार, हे दोन्ही बाजूंना माहीत होते. त्याला ‘म्युच्युअली अ‍ॅश्युअर्ड डिस्ट्रक्शन’ (मॅड) अशी संज्ञा होती. तो ‘मॅड’नेस लक्षात येऊन १९९० नंतर दोन्ही गटांनी युरोपमधील अण्वस्त्रे कमी केली.

sachin.diwan@expressindia.com