सचिन दिवाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्रायलने वैमानिकरहित विमाने किंवा ड्रोनचे महत्त्व अन्य देशांच्या तुलनेत लवकर ओळखले आणि ड्रोननिर्मिती उद्योग स्थापित केला. त्यातून सर्चर मार्क १, सर्चर मार्क २, हेरॉन, हॅरॉप, हार्पी, हर्मिस असे अनेक ड्रोन तयार केले. सध्या इस्रायल हा जगातील सर्वाधिक ड्रोन निर्यात करणारा देश आहे.

इस्रायलकडून ड्रोन आयात करणाऱ्या देशांत भारताचाही समावेश आहे. भारतीय सैन्यदलांकडे इस्रायलचे सर्चर मार्क १, सर्चर मार्क २ आणि हेरॉन आदी ड्रोन आहेत. कारगिल युद्धाच्या वेळी भारताला हिमालयाच्या उत्तुंग पर्वतराजींमध्ये टेहळणी करण्यासाठी सर्चर मार्क १ ड्रोन पुरेसे ठरले नाहीत.  ते अधिकाधिक १०,००० फूट उंचीवर काम करू शकत. हिमालयातील बरीच शिखरे त्यापेक्षा उंच आहेत. त्यामुळे २०,००० फूट उंचीवर काम करू शकणारे सर्चर मार्क २ ड्रोन घेण्यात आले. त्यानंतर हेरॉन ड्रोन घेताना सीमावर्ती भागांबरोबरच नक्षलग्रस्त प्रदेशातील टेहळणीला प्राधान्य होते.

इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने (आयएआय) १९८० च्या दशकात सर्चर डोन्स विकसित केले. ते त्यापूर्वीच्या अमेरिकी पायोनियर आणि स्काऊट ड्रोनसारखेच पण आकाराने मोठे आणि अधिक क्षमता असलेले आहेत. सर्चर मार्क २ ड्रोन ताशी २०० किमी वेगाने, हवेत २०,००० फूट उंचीवर सलग १८ तास उड्डाण करू शकतो.

इस्रायलचे हेरॉन हे अत्याधुनिक ड्रोन आहेत. ते मध्यम म्हणजे १० किमी (३२,००० ते ३५,००० फूट) उंचीवर काम करण्यासाठी आणि अधिक काळ (४५ ते ५२ तास) हवेत राहण्यासाठी  डिझाइन केले आहेत. ते ताशी २०७ किमी वेगाने प्रवास करू शकतात आणि २५० किलो वजनाचे शक्तिशाली थर्मोग्राफिक कॅमेरे, संवेदक आदी उपकरणे वाहून नेऊ शकतात. शत्रूप्रदेशावर टेहळणी करून गोळा केलेली माहिती ते जमिनीवरील नियंत्रण कक्षाला डेटा-लिंकच्या किंवा उपग्रहाच्या मदतीने पाठवू शकतात. हेरॉनचे नियंत्रण जमिनीवरून दूरनियंत्रण पद्धतीने (रिमोट कंट्रोल) होते. त्यात काही बिघाड झाला तरी हेरॉन त्याच्या ऑटो-कंट्रोल प्रणालीचा वापर करून तळावर सुखरूप परतू शकतो.

sachin.diwan@expressindia.com