इटलीतील बरेटा ही जगातील सर्वात जुनी आणि अद्याप सुरू असलेली शस्त्रास्त्र कंपनी मानली जाते. १५२६ साली स्थापना झाल्यापासून आजतागायत गेली ५०० वर्षे ही कंपनी इटालियन सैन्याला अव्याहतपणे शस्त्रे पुरवत आली आहे. सुरुवातीला ही कंपनी बंदुकांच्या केवळ बॅरल बनवत असे. आज ती मुख्यत्वे दर्जेदार पिस्तुलांसाठी प्रसिद्ध आहे.
बरेटाचे पहिले पिस्तूल १९१५ साली तयार झाले. प्रत्यक्षात पहिल्या महायुद्धात तातडीच्या गरजेतून या पिस्तुलाची निर्मिती झाली होती. पण त्याने बरेटासाठी एक नवे दालन उघडले आणि नंतर तिच बरेटाची ओळख बनली. बरेटा मॉडेल १९१५ पिस्तुलाची पहिली आवृत्ती ७.६५ मिमीची होती. त्यात रिकामे काडतूस बाहेर फेकण्यासाठी फायरिंग पिनचा वापर केला होता. या पिस्तुलाच्या पुढील आवृत्तीत कॅलिबर ९ मिमी करण्यात आले. तसेच रिकामे काडतूस बाहेर टाकण्यासाठी इजेक्टर स्टॉप पद्धत वापरण्यात आली. त्यामुळे सुधारित आवृत्ती अधिक खात्रीशीर बनली होती.
त्यानंतरचे पिस्तूल १९३४ साली बाजारात आले. दुसऱ्या महायुद्धात या पिस्तुलाचे व्यापक प्रमाणावर उत्पादन झाले आणि बरेटा जगातील सर्वात मोठय़ा पिस्तूलनिर्मात्या कंपन्यांपैकी एक बनली. १९३० च्या दशकात इटलीचे सैन्य जर्मनीच्या वॉल्थेर पीपी नावाच्या पिस्तुलाने चांगलेच प्रभावित झाले होते. त्यामुळे इटलीच्या सैन्याला पिस्तूल पुरवण्यासाठी जर्मनीच्या कंपनीकडून स्पर्धा निर्माण होण्याची भीती बरेटाला वाटत होती. त्यातून बरेटाने मॉडेल १९३४ हे सेमी -ऑटोमॅटिक पिस्तूल बनवले. ते इटलीच्या सैन्याने १९३७ साली अधिकृत पिस्तूल म्हणून स्वीकारले. त्याच्या पुढची मॉडेल १९३५ ही आवृत्तीही नंतर तयार झाली. ते पिस्तूलही एम १९३४ सारखेच होते. पण त्यातून .३२ एसीपी (७.६५ ब्राऊनिंग) काडतुसे डागली जात.
बरेटा पिस्तुलांची ओळखीची खूण म्हणजे त्यांच्या स्लाइडवरील भागातील मोकळी खाच. पिस्तूल कॉक करण्यासाठी स्लाइड खेचले जाते. गोळी झाडल्यानंतर स्लाइड मागेपुढे होते आणि त्याच्या वरील मोकळ्या खाचेतून झाडलेल्या काडतुसाचे रिकामे आवरण बाहेर पडते. बरेटाच्या एम १९३४ च्या निर्मितीत कमीत कमी सुटे भाग वापरलेले असल्याने ते वापरास आणि देखभालीस अत्यंत सोपे पिस्तूल होते. त्यात एक गोळी झाडल्यानंतर दुसरी गोळी चेंबरमध्ये आणण्यासाठी ब्लो-बॅक पद्धती वापरली होती. त्याच्या मॅगझिनमध्ये ७ गोळ्या मावत. या पिस्तुलाची एक त्रुटी म्हणजे त्याचा हॅमर उघडा होता. सेफ्टी कॅच लॉक केल्यावर केवळ ट्रिगर लॉक होत असे आणि हॅमर खुला राहत असे. अशा वेळी हॅमर नुसता ओढून सोडला तरी पिस्तुलातून चुकीने गोळी झाडली जात असे.
भारतीयांना बरेटा मॉडेल १९३४ पिस्तूल माहीत आहे, ते ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी वापरले म्हणून. त्याचा सीरियल नंबर ६०६८२४ असा होता आणि त्यात .३८० एसीबी प्रकारच्या गोळ्या वापरल्या जात. १९३४ साली इटलीत तयार झालेले हे पिस्तूल एका अधिकाऱ्याने इटलीच्या अॅबिसिनीयावरील आक्रमणात वापरले. त्यानंतर ते एका ब्रिटिश अधिकाऱ्याकडे गेले. त्यानंतर त्याची मालकी अनेकदा बदलली. पण ते भारतात कसे आले आणि गोडसेच्या हाती कसे पडले याचा नेमका सुगावा लागत नाही.
सचिन दिवाण – sachin.diwan@ expressindia.com