वाफेच्या शक्तीवर चालणाऱ्या व्यापारी आणि मालवाहू नौका वापरात आल्या असल्या तरी युद्धनौकांसाठी वाफेच्या शक्तीवरील इंजिने वापरण्यात नौदलाच्या सेनानींनी सुरुवातीला फारसा रस दाखवला नव्हता. त्याला तशी कारणेही होती. वाफेच्या शक्तीवर चालणाऱ्या युद्धनौका बांधताना अनेक अडचणी येत होत्या. या नौकांच्या रचनेत पेडल-व्हिल किंवा विहिरीवरील रहाटासारखे दिसणारे फिरते चाक असे. वाफेच्या शक्तीवर ही वल्ही चालवून नौकेला गती मिळत असे. पण ही गोलाकार चाकासारखी मोठी वल्ही नौकेच्या दोन्ही बाजूंनी निम्मी पाण्यात बुडलेल्या अवस्थेत असत. शत्रूच्या तोफेच्या माऱ्यांपुढे त्यांचा निभाव लागत नसे आणि त्यामुळे नौका शत्रूच्या माऱ्याला प्रवण बनत असे. तसेच त्या पूर्वीच्या काळात ज्या शिप-ऑफ-द-लाइन वापरात होत्या त्यांच्या दोन्ही बाजूंना दोन-तीन मजल्यांवर ओळीने तोफा (ब्रॉडसाइड गन्स) लावलेल्या असत.
वाफेच्या शक्तीवर चालणाऱ्या नौकेवरील पेडल-व्हिल्समुळे ब्रॉडसाइड-गन्स लावण्यासाठी अडचण येत असे. त्याने युद्धनौकेच्या मारक क्षमतेवर परिणाम होत असे. त्यासाठी काही तंत्रज्ञांनी पेडल-व्हिल नौकेच्या मधल्या भागात बसवण्याचा प्रयोग करून पाहिला. पण तो फारसा यशस्वी झाला नाही.
मात्र स्क्रू-प्रोपेलरच्या शोधानंतर या अडचणीवर मात करता आली. स्क्रू-प्रोपेलर नौकेच्या मागील किंवा पुढील भागात आणि पूर्णपणे पाण्यात बुडलेले असत. त्यामुळे नौकेचा पाण्यावरील भाग तोफा बसवण्यासाठी मोकळा मिळू लागला.
त्याची पंख्यासारखी पाती पाण्याला जोराने मागे रेटत नौकेला मार्ग काढून गती देत. त्यातही थोडय़ा वाकवलेल्या किंवा पिळलेल्या पात्यांच्या रचनेने वेग आणखी वाढला. तरीही नौदलाचे अधिकारी त्यावर पूर्ण विसंबून राहत नसत. ते वाफेच्या इंजिनाबरोबरच शिडांचाही वापर करत. अशा वेळी स्क्रू-प्रोपेलर पाण्यातून वर किंवा खाली खेचण्याची सोय केलेली असे. त्यावरूनच ब्रिटिश नौदलातील ‘अप फनेल-डाऊन स्क्रू’ ही आज्ञा तयार झाली आहे.
याचदरम्यान तोफांचाही विकास होऊन त्यांची क्षमता वाढत होती. त्या नौकेवर बसवणे हीदेखील एक कसरतच असायची. नौका अस्थिर होऊ न देता तोफा बसवण्याच्या विविध पद्धती विकसित होत गेल्या. त्यात फिरत्या टरेटवर तोफा बसवणे ही सर्वात आधुनिक पद्धत अस्तित्वात आली. तोफा स्मूथ-बोअरऐवजी रायफल्ड बनत गेल्या. त्याने त्यांचा पल्ला वाढत गेला. तोफांमध्ये गोळे भरण्याच्या पद्धतीतील बदलानेही त्यांची वापरासाठी सहजता वाढली. या सर्व बदलांमुले युद्धनौकांना आधुनिक रूप प्राप्त होत गेले. जुन्या शिडाच्या नौकांच्या जागी आता अधिक वेगवान आगबोटी दिसू लागल्या.
sachin.diwan@ expressindia.com