सोव्हिएत युनियनचे मिल एमआय-२६ हे जगातील सर्वात मोठे हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरची अफाट क्षमता पाश्चिमात्य विमान आणि हेलिकॉप्टर उद्योगाचे गर्वहरण करण्यास पुरेशी आहे. एमआय-२६ची वजन वाहून नेण्याची क्षमता अमेरिकेच्या बोइंग सीएच-४७ चिनुक या अवजड मालवाहू हेलिकॉप्टरच्या दुप्पट आहे. तर एमआय-२६ च्या पोटात अमेरिकेच्या लॉकहीड सी-१३० हक्र्युलस या मालवाहू विमानाइतकी सामान मावण्याची क्षमता आहे. भारतासह अनेक देशांच्या हवाई दलांत ते वापरात आहे.
सोव्हिएत युनियनच्या सेनादलांनी १९७०च्या दशकात अवजड मालवाहू हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी निकष जाहीर केले. रिकाम्या (इंधन भरलेले नसताना) हेलिकॉप्टरचे वजन हेलिकॉप्टर पूर्ण क्षमतेने भरून उड्डाण करताना जे वजन असेल त्याच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसावे, अशी अट त्यात घालण्यात आली होती. त्यानुसार सोव्हिएत हेलिकॉप्टर उद्योगाचे अध्वर्यू मिखाइल मिल यांचे पट्टशिष्य मरात तिश्चेंको यांनी एमआय-२६ची रचना केली. हेलिकॉप्टरच्या मोठय़ा फ्युजलाजच्या वरच्या बागात दोन शक्तिशाली लोतारेव्ह डी-१३६ टबरेसाप्ट जिने बसवण्यात आली. त्यांच्या ताकदीने आठ पात्यांचा मुख्य रोटर आणि पाच पात्यांचा टेल-रोटर फिरवला जातो. एमआय-२६चे पहिले यशस्वी उड्डाण १७ डिसेंबर १९७७ रोजी झाले आणि १९८३ साली ते सोव्हिएत हवाई दलांत सामील करण्यात आले.
एमआय-२६ हेलिकॉप्टरचे रिकामे असतानाचे वजन २८,२०० किलो आणि संपूर्ण क्षमतेने भरून उड्डाण करतानाचे वजन ५६,००० किलो असते. ते ताशी २९५ किमी वेगाने १९२० किमीचा प्रवास करू शकते. तसेच कमाल ४६०० मीटर (१५,१०० फूट) उंची गाठू शकते. त्याची लांबी १३१ फूट, उंची २६ फूट तर पंखांचा व्यास १०५ फूट आहे. ते एका वेळी ६५ सैनिक त्यांच्या संपूर्ण शस्त्रास्त्रांसह वाहून नेऊ शकते. त्याचा मालवाहतुकीसह पाणबुडीविरोधी कारवायांमध्ये आणि इंधनाचा टँकर म्हणूनही वापर करता येतो.
एमआय-२६ने १९८२ साली ५६,७६८ किलो वजन २००० मीटर उंचीवर वाहून नेऊन आपली क्षमता सिद्ध केली. इतकेच नव्हे तर अफगाणिस्तामध्ये २००२ साली ऑपरेशन अॅनाकोंडादरम्यान अमेरिकेचे चिनुक हेलिकॉप्टर पडले. ते उचलून नेण्यासाठी बेल्जियममधील खासगी कंपनीकडील ३०,००० किलो वहनक्षमतेचे एमआय-२६ खास मागवण्यात आले.
भारतासह बेलारूस, कझाकस्तान, काँगो, मेक्सिको, पेरू, युक्रेन, व्हेनेझुएला आदी देशांकडे एमआय-२६ वापरात आहेत.
sachin.diwan@expressindia.com