आगीचा शस्त्र म्हणून वापर फार प्राचीन काळापासून होत आहे. शत्रूवर अग्निवर्षांव करणे याला युद्धात अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळानुसार त्याच्या पद्धती बदलल्या असल्या तरी त्याची उपयुक्तता अबाधित आहे.
शत्रूच्या घरे, शेते, गोदामे, किल्ले अशा मालमत्तेला आग लावणे ही त्याची अगदी साधीसोपी पद्धत प्रचारात होती. त्यासाठी पेटत्या मशाली-पलिते वापरणे सामान्य होते. जनावरांच्या शिंगांना पेटते पलिते बांधून शत्रच्या प्रदेशात सोडणे हीदेखिल एक पद्धत होती. तसेच पेटत्या बाणांचा वर्षांव करणे, बॅलिस्टासारख्या आयुधांनी पेटते गोळे शत्रूप्रदेशावर डागणे असे प्रकारही केले जात.
बायझंटाइन (कॉन्सँटिनोपोल) काळात शत्रूवर आग ओकणाऱ्या नळ्या तयार केल्या होत्या. त्याला ‘ग्रीक फायर’ म्हटले जात असे. विशेषत: नाविक युद्धात ही पद्धत वापरली जात असे. नौकेवरील सैनिक शत्रूच्या नौकेच्या जवळ जाऊन त्यावर अशा प्रकारे आग सोडत. त्याने नौकांना आग लागून त्या जळून बुडत असत.
अगदी प्राथमिक पण जगभर दंगलखोरांकडून वापरला जाणारा प्रकार म्हणजे ‘मोलोटोव्ह कॉकटेल’ किंवा पेट्रोल बॉम्ब. दुसऱ्या महायुद्धात आणि तत्पूर्वीच्या काळात सोव्हिएत युनियनचे परराष्ट्रमंत्री असलेल्या व्याचेस्लाव्ह मोलोटोव्ह यांच्या धोरणांविरुद्ध लढणाऱ्या फिनलंडच्या गनिमी योद्धय़ांनी त्यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यासाठी पेट्रोल बॉम्बला मोलोटोव्ह कॉकटेल असे नाव दिले होते. त्यात पेट्रोल किंवा कोणताही साधा ज्वालाग्राही द्रवपदार्थ काचेच्या बाटलीत भरून, त्यात बुडवलेल्या कापडी वातीला पेटवून शत्रूवर फेकले जाते.
फ्लेमथ्रोअर नावाच्या शस्त्रात हेच काम थोडे यांत्रिकी पद्धतीने केले जाते. सैनिकाच्या पाठीवरील टाकीत नैसर्गिक वायू, प्रोपेनसारखी ज्वालाग्राही रसायने उच्च दाबाखाली भरलेली असतात. ती नळीद्वारे बंदुकीसारख्या भागाला जोडलेली असतात. त्याचा चाप दाबून या शस्त्रातून काही मीटर अंतरावर आग फेकता येते. दोन्ही महायुद्धांसह, कोरियन आणि व्हिएतनाम युद्धांत त्यांचा मोठय़ा प्रमाणावर वापर झाला. मात्र त्याचा पल्ला खूप कमी असतो आणि पाठीवरील टाकीवर गोळी किंवा तोफगोळ्याचा तुकडा लागला तर ते सैनिकांसाठी खूप घातक असते.
sachin.diwan@expressindia.com