दोन्ही महायुद्धांत आणि त्यानंतर शीतयुद्धात पाणबुडय़ांनी महासागरांवर हुकूमत गाजवली. पाणबुडय़ा जशा प्रगत होत गेल्या तसे त्यांना शोधून नष्ट करण्याचे तंत्रही विकसित होत गेले. त्यासाठी खास विमाने आणि हेलिकॉप्टर तयार झाली. त्यातून पाणबुडीविरोधी युद्ध (अँटि-सबमरिन वॉरफेअर- एएसडब्ल्यू) ही वेगळी युद्धशाखाच आकारास आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधुनिक पाणबुडय़ांची सलग पाण्याखाली राहण्याची क्षमता बरीच वाढली असली तरी त्यांना बॅटरी चार्ज करण्यासाठी, अन्नसामग्री आणि दारूगोळा भरण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते. त्यांच्या पेरिस्कोपचे, एअर ब्रिदिंग टय़ूब किंवा श्नॉर्केलचे टोक पाण्यावर आलेले असते. पाणबुडी मोठी असेल तर तेथे पाण्याच्या पृष्ठभागाला किंचित फुगवटा आलेला असतो. इंजिनाचा आवाज, त्यातून इंधनाची गळती, पाणबुडीच्या धातूच्या ढांचाचे चुंबकीय गुणधर्म आदी बाबींवरून पाणबुडीचा माग काढता येतो आणि पाणबुडी नष्ट करण्यास मदत होते. हे संकेत टिपण्यासाठी पाणबुडीविरोधी विमाने विशेष प्रकारे रूपांतरित केलेली असतात. ती दीर्घकाळ समुद्रावर फिरून टेहळणी करू शकतात. तसेच मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्रे वाहून नेऊ शकतात. बहुतांश सागरी टेहळणी विमाने जमिनीवरील टेहळणीसाठीही उपयुक्त आहेत.

ही सागरी टेहळणी विमाने अँटि-सबमरिन किंवा मेरिटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट म्हणून ओळखली जातात. फ्रेंच ब्रुगेई/दसाँ कंपनीचे अटलांटिक, ब्रिटिश निमरॉड, अमेरिकी पी-२ व्ही नेपच्यून, पी-३ सी ओरायन, पी-८ पॉसिडॉन, रशियन इल्युशिन आयएल-३८, टय़ुपोलेव्ह टीयू-१४२ ही आधुनिक काळातील काही महत्त्वाची सागरी टेहळणी विमाने आहेत.

कारगिल युद्धानंतर महिनाभरात म्हणजे ऑगस्ट १९९९ मध्ये गुजरातमधील कच्छच्या रणात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे अटलांटिक विमान पाडले होते. पाकिस्तानकडील ४ अमेरिकी पी-३ सी ओरायन विमानांपैकी २ विमाने कराचीतील तळावरील दहशतवादी हल्ल्यात नष्ट झाली होती. भारतीय नौदलाकडे रशियन टीयू-१४२ आणि अमेरिकी पी-८ आय पॉसिडॉन विमाने आहेत. ती शेकडो किलोमीटरच्या प्रदेशात अनेक तास टेहळणी करू शकतात. त्यावर अत्याधुनिक संवेदक, रडार आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत. पॉसिडॉन टॉर्पेडो, डेप्थ चार्ज, रॉकेट, हार्पून ब्लॉक-२ क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकते.

sachin.diwan@ expressindia.com