दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियनच्या कात्युशा रॉकेट्सनी तोफखान्याला मोठी ताकद प्रदान केली होती. त्याच मार्गावर पुढे जात रशियाने युद्धानंतर बीएम-१४ ही १४० मिमी व्यासाची मल्टिपल रॉकेट लाँच सिस्टिम तयार केली. त्यातून प्रत्येकी ८ किलो स्फोटके वाहून नेणारी १६ रॉकेट ९.७ किमी अंतरावर डागता येत असत. त्यानंतर वापरात आलेल्या बीएम-२४ या प्रणालीतून प्रत्येकी २७.४ किलो स्फोटके वाहणारी १२ रॉकेट १०.४ किमी अंतरावर डागली जात.
रशियाने १९६० च्या दशकात ‘९ के ५१’ किंवा ‘बीएम-२१ ग्राद’ (हेल) नावाने १२२ मिमी व्यासाची आणि १० फूट लांबीची रॉकेट डागणारी प्रणाली बनवली. त्यात लष्करी ट्रकवर ४० बॅरल्स बसवण्यात आली होती. त्यातून केवळ २० सेकंदांत प्रत्येकी २५ किलो स्फोटके वाहून नेणारी ४० रॉकेट ४० किलोमीटर अंतरावर डागता येत. भारतासह अनेक देशांच्या तोफखान्यात ही शस्त्रे अद्याप वापरात आहेत. त्यानंतर रशियाने १९७० च्या दशकात ‘९ पी १४० उर्गन’ (हरिकेन) किंवा ‘बीएम-२७’ नावाने नवी रॉकेट प्रणाली तयार केली. त्यातून प्रत्येकी १०० किलो स्फोटके नेणारी १६ रॉकेट २० सेकंदांत डागली जात. त्यांचा पल्ला ३५ किमी आहे. त्यानंतर रशियाने बनवलेली ‘९ के ५८’ स्मर्च (टोरनॅडो) बीएम-३० ही प्रणाली प्रत्येकी २५८ किलो स्फोटके असलेली १२ रॉकेट ३८ सेकंदांत ९० किमी अंतरावर डागू शकते.
सोव्हिएत युनियनच्या या शस्त्रांना प्रतिसाद म्हणून अमेरिकेने ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्सच्या मदतीने ‘एम २७०’ मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टिम (एमएलआरएस) विकसित केली. तिचे सुरुवातीचे नाव ‘जनरल पर्पज रॉकेट सिस्टिम’ असे होते. ते १९७९ साली बदलले. ब्रॅडले चिलखती वाहनावर बसवलेली ही प्रणाली एका मिनिटाहून कमी वेळात १२ रॉकेट ४२ किमी अंतरावर डागू शकते.
चीनने ‘टाइप ६३/८१’ नावाने, फ्रान्सने ‘एलआरएम’ या नावाने, भारताने ‘पिनाका’ नावाची तर ब्राझिलने ‘अॅट्रॉस-२’ नावाने मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टिम बनवल्या. अशा शस्त्रांनी पारंपरिक तोफखान्याला आणखी गती आणि संहारकता बहाल केली. त्यातून केवळ काही सेकंदांच्या अवधीत शत्रूवर तुफानी मारा करता येतो. व्हिएतनाम, अरब-इस्रायल, इराक-कुवेत, इराक आणि अफगाणिस्तानमधील अमेरिकेची कारवाई, भारत-पाकिस्तानमधील कारगिल युद्ध आदी संघर्षांत त्यांचा प्रभावी वापर झाला आहे.
sachin.diwan@ expressindia.com