सचिन दिवाण sachin.diwan@expressindia.com
भारताचे ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने ‘के’ वर्गातील क्षेपणास्त्रे विकसित केली जात आहेत. त्यात प्रामुख्याने ‘के-१५ सागरिका (बी-०५)’ आणि ‘के-४’ या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. ‘के’ वर्गातील क्षेपणास्त्रे पाणबुडीतून डागली जाणारी म्हणजे सबमरीन लाँच्ड बॅलिस्टिक मिसाइल (एसएलबीएम) प्रकारची आहेत. ती अरिहंत या स्वदेशी अणुपाणबुडीवर तैनात करण्याची योजना आहे. त्यांचा विकास आणि निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) यांच्याकडून होत आहे.
ही क्षेपणास्त्रे अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून भारताचे जमीन, पाणी आकाशातून अण्वस्त्रे डागण्याची क्षमता मिळवण्याचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. त्याला न्यूक्लिअर ट्राएड म्हणतात. त्याचा अरिहंत पाणबुडी आणि सागरिका क्षेपणास्त्रे हे त्याचे महत्त्वाचे अंग असेल. युद्धात प्रथम अण्वस्त्रे वापरायची नाहीत (नो फर्स्ट यूज) असे भारताचे धोरण आहे. त्यामुळे शत्रूच्या पहिल्या हल्ल्यात काही अण्वस्त्रे नष्ट होण्याची शक्यता गृहीत धरून प्रतिहल्ल्यासाठी अण्वस्त्रे राखून ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याखाली कोलवर आणि दीर्घकाळ लपू शकणाऱ्या अणुपाणबुडय़ा आणि एसएलबीएमना महत्त्व आहे. अरिहंत अणुपाणबुडी आणि सागरिका क्षेपणास्त्रांमुळे भारताला नेमकी हीच आण्विक प्रतिहल्ल्याची क्षमता (सेकंड स्ट्राइक कपॅबिलिटी) मिळणार आहे.
के-१५ सागरिका या क्षेपणास्त्राचा पल्ला ७५० किमी आहे. ते घनरूप इंधनावर आधारित असून १००० किलो वजनाची स्फोटके वाहून नेऊ शकते. त्याचे वजन १० टन असून लांबी १० मीटर आहे. या क्षेपणास्त्राच्या चाचण्या पार पडल्या असून उत्पादन सुरू झाले आहे. त्याची पुढील आवृत्ती के-४ नावाने ओळखली जाते. तिचा पल्ला ३५०० किमी असून त्यावर १००० किलोहून अधिक वजनाची स्फोटके बसवता येतात. त्याची लांबी १० मीटर आणि वजन २० टन आहे. या क्षेपणास्त्राच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. या क्षेपणास्त्राचा पल्ला आणि स्फोटके वाहण्याची क्षमता वाढवून के-५ आणि के-६ ही क्षेपणास्त्रे तयार करण्याची योजना आहे. त्यांचा पल्ला ५००० ते ६००० किमी असेल आणि त्यावर एकापेक्षा जास्त अण्वस्त्रे (एमआयआरव्ही) बसवण्याची सोय असेल.
सागरिका क्षेपणास्त्राची हवेतून डागता येणारी आवृत्तीही विकसित करण्याची योजना आहे. तिला एअर लाँच्ड आर्टिकल म्हटले जाते आणि तिचा पल्ला २०० किमी असेल. तिच्यावर ५०० किलो वजनाची स्फोटके बसवता येतील आणि हे क्षेपणास्त्र हायपरसॉनिक वेगाने (ध्वनीच्या वेगापेक्षा सातपट) प्रवास करू शकेल. सागरिकाची जमिनीवरून डागता येणारी आवृत्तीही विकसित केली जात आहे. ही क्षेपणास्त्रे पूर्वीच्या पृथ्वी आणि अग्नि क्षेपणास्त्रांपेक्षा सुबक बांधणीची, वेगवान आणि अधिक अचूक आहेत.