सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com
अमेरिकेने आंतरखंडीय क्षेपणास्त्रांवर एकापेक्षा अधिक अण्वस्त्रे बसवण्याची क्षमता मिळवून शस्त्र स्पर्धेत आघाडी घेतली. मात्र सोव्हिएत युनियननेही लवकरच हे तंत्रज्ञान हस्तगत करून अमेरिकेच्याही पुढे मजल मारली.
सॅपवूड आणि सॅडलर क्षेपणास्त्रांनंतर सोव्हिएत युनियनने आर-९ देस्ना नावाचे क्षेपणास्त्र विकसित केले. त्याला नाटो संघटनेने एसएस-८ सॅसिन असे सांकेतिक नाव दिले. ही क्षेपणास्त्रे १९६४ ते १९७६ या काळात सोव्हिएत सेनादलांत कार्यरत होती. हे क्षेपणास्त्र ११,००० किमी अंतरावर मारा करत असे. त्यावर एकच अण्वस्त्र बसवता येत असले तरी त्याची अचूकचा बरीच चांगली म्हणजे २ किमीपर्यंत होती. तसेच त्यात द्रवरूप इंधन वापरले जात असले तरी हे क्षेपणास्त्र डागण्याची आज्ञा मिळाल्यापासून ते प्रत्यक्ष डागण्याचा वेळ केवळ २० मिनिटे होता. या सुधारणांनी सोव्हिएत युनियनला वेगाने क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता मिळाली.
त्यापुढील आर-३६ किंवा एसएस-९ स्कार्प क्षेपणास्त्रावर तीन अण्वस्त्रे बसवण्याची सोय केली गेली आणि सोव्हिएत युनियनलाही मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रि-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) तंत्रज्ञान मिळाले. यानंतर सोव्हिएत युनियनने एसएस-१० स्क्रॅग, एसएस-११ सेगो, एसएस-१३ सॅव्हेज ही आंतरखंडीय क्षेपणास्त्रे बनवली. ती अमेरिकेच्या मिनिटमन मालिकेतील क्षेपणास्त्रांच्या बरोबरीची होती आणि त्यावर तीन अण्वस्त्रे बसवता येत होती. एसएस-१३ मध्ये घनरूप इंधन वापरले होते. एसएस म्हणजे सरफेस टू सरफेस (जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या) क्षेपणास्त्रांच्या मालिकेतील पुढील एसएस-१४ स्केपगोट किंवा स्कॅम्प आणि एसएस-१५ स्क्रूज ही मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे होती. त्यानंतर जुनी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे बदलण्यासाठी सोव्हिएत युनियनने १९७० च्या दशकात एसएस-१६ सिनर, एसएस-१७ स्पँकर, एसएस-१८ सॅटन, एसएस-१९ स्टिलेटो आणि एसएस-२० सेबर ही आंतरखंडीय आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित केली.
या काळात सोव्हिएत एमआयआरव्ही तंत्रज्ञानात बरीच सुधारणा होऊन एका क्षेपणास्त्रावर १० अण्वस्त्रे बसवण्याइतपत क्षमता प्राप्त झाली आणि त्यांचा पल्ला १६,००० किमीपर्यंत वाढला. तसेच ही नवी क्षेपणास्त्रे द्रवरूपऐवजी घनरूप इंधनावर आधारित होती. त्यांनी सोव्हिएत युनियनला अमेरिकेच्या बरोबरीस किंबहुना थोडे पुढेच नेऊन ठेवले. त्याने अमेरिका आणि पश्चिम युरोपातील देशांच्या नेत्यांची झोप उडवली. आता शीतयुद्धातील शस्त्रास्त्र स्पर्धा उच्चतम पातळीला पोहोचली होती. क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रांचा इतका प्रसार झाला होता की एखाद्या क्षुल्लक चुकीतूनही अणुयुद्धाचा भडका उडून पृथ्वीचा संपूर्ण विनाश ओढवू शकला असता. ही परिस्थिती टाळण्यासाठी आणि अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये स्ट्रॅटेजिक आम्र्स लिमिटेशन ट्रीटी (सॉल्ट) आणि स्ट्रॅटेजिक आम्र्स रिडक्शन ट्रीटी (स्टार्ट-१ आणि स्टार्ट-२) असे करार झाले. त्यांनी जगाला काहीसा दिलासा मिळाला.