अटलांटिक महासागरातील फॉकलंड (माल्विना) बेटांच्या मालकीवरून १९८२ साली ब्रिटन आणि अर्जेटिना यांच्यात युद्ध झाले. हे आधुनिक काळातील महत्त्वाचे सागरी युद्ध. त्यात काँकरर या ब्रिटिश अणुपाणबुडीने टॉर्पेडो डागून अर्जेटिनाची जनरल बेलग्रानो नावाची क्रूझर नौका बुडवली. त्यानंतर दोनच दिवसांत अर्जेटिनाच्या लढाऊ विमानातून डागलेल्या फ्रेंच बनावटीच्या एक्झोसेट या क्षेपणास्त्राने ब्रिटनची शेफिल्ड ही विनाशिका बुडवली. त्यानंतर ब्रिटनने आणखी एक विनाशिका, २ फ्रिगेट, २ लँडिंग शिप यासह अन्य काही नौका गमावल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या युद्धातून ब्रिटनसह अमेरिका आणि अन्य ‘नाटो’ देशांनी धडा घेतला. दुसऱ्या महायुद्धानंतर साम्राज्य गमावलेल्या ब्रिटनला आर्थिक अडचणींतून जावे लागत असल्याने नौदलावरील खर्चाला पुरेसा निधी उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्यांच्या युद्धनौका लहान आणि कमी संरक्षण असलेल्या बनल्या होत्या. शेफिल्ड ही ब्रिटनची टाइप-४२ वर्गातील विनाशिका होती. फॉकलंड युद्धानंतर ब्रिटन, अमेरिका आदी ‘नाटो’ देशांनी मजबूत आणि अत्याधुनिक युद्धनौका बनवण्यावर भर दिला.

तत्पूर्वी अमेरिकेने स्प्रुआन्स वर्गातील विनाशिका तयार केल्या होत्या. त्यांचा भर पाणबुडीविरोधी लढायांवर होता. स्प्रुआन्स वर्गातील विनाशिकांची रचना आधुनिक काळातील सर्वात प्रभावी मानली जाते. त्यात काहीसा बदल करून विमानविरोधी भूमिकेसाठी किड वर्गातील विनाशिका तयार केल्या. स्प्रुआन्स वर्गातील काही विनाशिकांवर टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रेही बसवली गेली. त्यांनी १९९१ सालच्या आखाती युद्धातही भाग घेतला.

१९६०-७०च्या दशकात सोव्हिएत युनियनच्या कशिन वर्गातील विनाशिकाही प्रभावी होत्या. त्यावरूनच भारतीय नौदलातील राजपूत, राणा, रणजित या युद्धनौका बनवल्या आहेत. याच काळात जर्मनी आणि अमेरिकेच्या लुटजेन्स वर्गातील विनाशिकाही प्रभावी मानल्या जात.

सध्या अमेरिकेकडे अर्लिघ बर्क वर्गातील अत्याधुनिक विनाशिका आहेत. त्यावर इजिस इंटीग्रेटेड कॉम्बॅट सिस्टम आहे. त्यात आधुनिक रडारसह टॉमहॉक आणि स्टॅण्डर्ड क्षेपणास्त्रे आदींचा समावेश आहे. ब्रिटनच्या डेअरिंग या सर्वात आधुनिक विनाशिका आहेत. त्यावर सी-व्हायपर, अ‍ॅस्टर-१५, हार्पून ही क्षेपणास्त्रे आहेत. सुरुवातीला टॉर्पेडो बोटाविरुद्ध नौका म्हणून उदयास आलेली विनाशिका आता पाणबुडी आणि लढाऊ विमानविरोधी अस्त्र म्हणून उत्क्रांत झाली आहे.

sachin.diwan@expressindia.com