समुद्रातील युद्धे अनेक शतके केवळ पाण्याच्या पृष्ठभागावरच होत होती. साधारण सतराव्या-अठराव्या शतकात पाणबुडी (सबमरीन) बनवण्याचे प्रयत्न काहीसे फलद्रूप होऊ लागले होते. अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धात अगदी प्राथमिक स्वरूपाच्या पाणबुडीचा सर्वप्रथम वापर झाला.

अमेरिकी तंत्रज्ञ डेव्हिड बुशनेल यांनी टर्टल (कासव) नावाची पहिली पाणबुडी बनवली. तिची रचना अगदी साधी होती. एखाद्या पिंपाप्रमाणे (बॅरल) पोकळ लाकडी नौकेला वरून धातूचे आवरण चढवले होते. आतील पोकळीत एका माणसाची बसण्याची सोय होती. तो पायाजवळचे पेडल चालवून नौका पुढे नेऊ शकत असे. तर हाताने चक्र फिरवून नौका वर-खाली नेता येत असे. बंदिस्त नौकेत फारतर अर्धा तास पुरेल इतकाच प्राणवायू होता. सरजट इझ्रा ली याने १७७६ साली न्यूयॉर्क बंदरातील ईगल या ब्रिटिश युद्धनौकेवर हल्ला करण्यासाठी टर्टलचा वापर केला. टर्टलमधून पाण्याखालून लपत जाऊन ईगलच्या तळाला खालून सुरुंग लावून परत येणे अशी योजना होती. त्यासाठी ईगलच्या तळाला ड्रिल मशिनने छिद्र पाडायचे होते. पण ईगलच्या तळावर बसवलेल्या धातूच्या आवरणामुळे ऐनवेळी छिद्र पाडता आले नाही आणि योजना फसली. पण तो पाणबुडीचा युद्धातील पहिला वापर मानता येईल.

या घटनेने पाण्याखाली बंदिस्त नौका वापरण्याची कल्पना तत्त्वत: मान्य झाली होती. त्यात तांत्रिक सुधारणा करण्याचे प्रयत्न अनेक देशांकडून होत होते. समुद्रात अधिक खोलवर गेल्यास पाण्याच्या दाबाने पाणबुडीचा अंत:स्फोट (इम्प्लोजन) होऊ शकतो. त्यासाठी पुरेशी शक्तिशाली आवरण असलेली पाणबुडी तयार करणे हे आव्हान होते. त्यात अधिक काळ पुरेल इतक्या प्रमाणात प्राणवायूची सोय करणे, पाणबुडीला पाण्याखाली गती देणे आणि तिच्यावर नियंत्रण ठेवणे या पुढील अडचणी होत्या. त्या सर्वावर मात करून जर्मनीने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांत पाणबुडय़ांचा अत्यंत प्रभावी वापर केला. जर्मन पाणबुडय़ा यू-बोट (उंटरसीबुट म्हणजे इंग्रजीत अंडर सी बोट) म्हणून ओळखल्या जात. तत्पूर्वी १९०४-०५ सालच्या रशिया-जपान युद्धात जपानने पोर्ट ऑर्थर या बंदराची केलेली नाकेबंदी फोडण्यासाठी रशियाने पाणबुडय़ांचा वापर केला होता.

sachin.diwan@ expressindia.com