यदाकदाचित शीतयुद्ध प्रत्यक्ष युद्धात परिवर्तीत झालेच तर युरोपच्या भूमीत अमेरिका  आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांचा संघर्ष अटळ होता. त्या परिस्थितीत युरोपला दुभंगणारा ‘पोलादी पडदा’ (आयर्न कर्टन) फाडून पश्चिम युरोपमध्ये मोठय़ा संख्येने घुसता यावे या उद्देशाने सोव्हिएत युनियनने ‘टी-७२’ या रणगाडय़ाची निर्मिती केली होती. १९७२ साली अस्तित्वात आलेल्या या रणगाडय़ाने १९९१ साली सोव्हिएत महासंघाचे विघटन होईपर्यंत सोव्हिएत ‘मेन बॅटल टँक’ (एमबीटी) म्हणून भूमिका बजावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय रणगाडा दलांत प्रामुख्याने ‘टी-७२’ चा भरणा आहे. भारतासह झेकोस्लोव्हाकिया, इराण, इराक, पोलंड, युगोस्लाव्हिया आदी देशांत त्यांचे उत्पादन होत होते. आजवर साधारण ५० हजारांहून अधिक ‘टी-७२’ चे उत्पादन झाले असून आजही ४० देशांच्या लष्करात त्यांचा वापर होत आहे.

बहुतांश पाश्चिमात्य रणगाडय़ांशी समोरासमोरच्या युद्धात ‘टी-७२’ कदाचित तुल्यबळ ठरणारा नव्हता. पण सोव्हिएत रणनीती त्यांच्या संख्याबळावर आधारित होती. मोठय़ा संख्येने हल्ला करून शत्रूला निष्प्रभ करणे हा त्यांचा उद्देश होता. त्या दृष्टीने यापूर्वीच्या निर्मितीला अवघड ‘टी-६४’ रणगाडय़ात सुधारणा करून उत्पादनास सोपा, सुटसुटीत ‘टी-७२’ घडवला होता. अन्य रशियन रणगाडय़ांप्रमाणेच ‘टी-७२’ उंचीने कमी आणि फ्राइंग पॅनच्या आकाराचे आटोपशीर गन टरेट असलेला आहे. त्याला चालवण्यास तीनच कर्मचारी पुरेसे आहेत. पण त्यांची अधिकतम उंची १७५ सेंमीपेक्षा कमी असावी असा निकष होता.  त्यावर २५० मिमी जाडीचे चिलखत आणि १२५ मिमी व्यासाची मुख्य तोफ व दोन मशिनगन आहेत. ४४ टन वजनाचा हा रणगाडा ताशी ६५ किमीच्या वेगाने एका दमात ४०० किमीपर्यंत मजल मारू शकतो.

आजच्या अत्याधुनिक रणगाडय़ांमध्ये असणाऱ्या अनेक सुविधा त्यात प्रथमच उपल्बध करून देण्यात आल्या होत्या. त्यावर ‘कॉन्टॅक्ट-५’ नावाचे ‘एक्स्प्लोझिव्ह रिअ‍ॅक्टिव्ह आर्मर’ आहे. त्याच्या तोफेची ऑटो-लोडर प्रणाली १३ सेकंदांत ३ तोफगोळे डागण्यास सक्षम आहे. त्याचा तोपची (गनर) लक्ष्याचा वेध घेण्यासाठी दिवसा लेझर रेंजफाईंडरची आणि रात्री अंधारात इन्फ्रारेड (अवरक्त किरण) साइट्सची मदत घेऊ शकतो. या रणगाडय़ात कर्मचाऱ्यांना आण्विक, जैविक आणि रासायनिक शस्त्रांच्या हल्ल्यापासून वाचवण्याची क्षमता आहे. अशा वेळी संपूर्ण रणगाडा सील होऊन हवा फिल्टर होऊन आत येते. १९९१ च्या आखाती युद्धात इराक आणि कुवेत अशा दोघांकडेही हे रणगाडे होते. पण अमेरिकी ‘अ‍ॅब्राम्स’ आणि ब्रिटिश ‘चॅलेंजर’ रणगाडय़ांपुढे त्यांचा निभाव लागला नाही.

sachin.diwan@ expressindia.com