राम, अर्जुन, कर्ण, एकलव्य यांसारख्या श्रेष्ठ धनुर्धरांच्या देशात धनुर्विद्येबद्दल नव्याने लिहिण्यासारखे काही नाही, असे वाटेल कदाचित. पण मुळात रामायण-महाभारत हा आपला इतिहास आहे की ती केवळ महाकाव्ये आहेत हेच आजवर सिद्ध झालेले नाही. ते असो. त्यापेक्षा थोडय़ा अलीकडचे, ज्ञात इतिहास व पुरावे असलेल्या काळातील उदाहरण घेऊ. १३व्या व १४व्या शतकात पूर्वेला जपानचा समुद्र, सैबेरिया, रशिया, चीन, मध्य आशियाची गवताळ कुरणे, भारतीय उपखंडाचा काही भाग, अरबस्तान आणि युरोपपर्यंत वेगाने विस्तारलेले मंगोल साम्राज्य. त्याच्या प्रसारामागे चेंगिझ खानसारखे क्रूरकर्मा शासक तर होतेच, पण मंगोल धनुर्विद्येनेही त्यांच्या साम्राज्यविस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनुष्य-बाणाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. जगाच्या बहुतेक सर्व भागांत अगदी आदिवासी काळापासून शिकार आणि युद्धात हे शस्त्र वापरले गेले आहे. पण युद्धभूमीत त्याचा मंगोलांइतका प्रभावी वापर फार कमी जनसमुदायांनी केला असेल. मंगोल धनुष्य-बाणांचा एकूण पल्ला २०० ते ४०० मीटरच्या आसपास होता. म्हणजे आजच्या ‘असॉल्ट रायफल’च्या तोडीचा. साधारण २०० मीटपर्यंत ते एकटय़ा शत्रूसैनिकाचा वेध घेऊ शकत.  उपजतच निष्णात घोडेस्वार असलेले मंगोल लढवय्ये हे धनुष्य-बाण घेऊन जेव्हा मध्य आशियाच्या गवताळ मैदानी प्रदेशात चढाया करत, तेव्हा ती लाट रोखणे शत्रूसाठी मोठे आव्हान असे.

या यशाचे रहस्य होते मंगोल धनुष्याच्या रचनेत. हे धनुष्य ‘लाँग-बो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्वीच्या पुरुषभर उंचीच्या धनुष्यांपेक्षा लांबीने बरेच लहान होते. त्यामुळे घोडय़ावर स्वार होऊन दोन्ही बाजूंना तिरंदाजी करणे सुलभ झाले होते. तसेच मंगोल धनुष्य विविध कच्चा माल एकत्र वापरून बनवलेले (कॉम्पोझिट) असत. धनुष्याला बाण लावून प्रत्यंचा (दोरी) आकर्ण ताणली असता धनुष्याच्या पुढील किंवा शत्रूकडील पृष्ठभागावर (बॅक किंवा पाठ) अधिक ताण पडतो, तर दोरीकडचा आतील पृष्ठभाग (बेली किंवा पोट) अधिक आक्रसला जातो. म्हणजेच धनुष्याच्या दोन्ही पृष्ठभागांवर एकाच वेळी वेगवेगळ्या प्रमाणात ताण पडत असतो. तो सहन करण्यासाठी त्याच्या निर्मितीसाठी वापरलेल्या साहित्यात (मटेरियल) कठीणपणा आणि लवचिकता यांचा योग्य संयोग असणे आवश्यक असते. त्यासाठी धनुष्याचा मधला भाग बांबू किंवा बर्च झाडाच्या लाकडापासून बनवत. आतील पृष्ठभागासाठी जनावरांच्या शिंगाचा तर बाहेरील पृष्ठभागासाठी ‘सिन्यू’ नावाचा प्राणीजन्य पदार्थ वापरला जायचा. सिन्यू म्हणजे प्राण्यांच्या शरीरात हाडे व स्नायू जोडण्यासाठी असलेले लांब व लवचिक ‘टेंडॉन’ नावाचे चेतातंतू. ते ‘कॉलॅजेन’ नावाच्या द्रव्यापासून बनलेले असतात आणि बरेच लवचिक असतात. मंगोल धनुष्यासाठी प्राण्यांच्या पाठीतील किंवा पायातील टेंडॉन वापरत. यांच्या संयोगामुळे मंगोल धनुष्यांमध्ये कमालीची ताकद येत असे. आणि हीच ताकद त्यांच्या साम्राज्याचा तीरासारखा दूरवर विस्तार होण्यासही साहाय्यभूत ठरली होती.

मात्र हे कॉम्पोझिट धनुष्य बनवण्यास बराच वेळ आणि वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य लागत असे. त्यातील प्राणीजन्य डिंक दमट वातावरणात हवेतील ओलावा शोषून घेऊन धनुष्याची ताकद कमी होत असे. त्यामुळे ते चामडी आवरणात ठेवावे लागत. म्हणूनच पावसाळी हवामानाच्या प्रदेशात ऐतिहासिकदृष्टय़ा साधे धनुष्य किंवा सेल्फ-बो वापरलेले आढळतात.

सचिन दिवाण : sachin.diwan@ expressindia.com