सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com

पहिल्या महायुद्धातील घटना. २२ एप्रिल १९१५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याचा सुमार. बेल्जियमधील यीप्रच्या आघाडीवरील खंदकांमध्ये तैनात फ्रेंच आणि अल्जेरियन सैनिकांनी पलीकडून जर्मन सैन्याच्या खंदकांमधून हिरवट रंगाचा दाट ढग त्यांच्या दिशेने येताना पाहिला. प्रथम त्यांना वाटले की जर्मन खंदकात आग लागली असेल. फ्रेंच सैनिकांचे सुरुवातीचे कुतुहल लवकरच कोलाहलात परिवर्तित झाले. फ्रेंच सैनिकांचा अचानक श्वास गुदमरू लागला, अंगाला आकडी येऊ लागली, तोंडाला फेस येऊ  लागला आणि रक्ताच्या उलटय़ा होऊ  लागल्या. काही कळण्याच्या आत ५००० फ्रेंच आणि अल्जेरियन सैनिकांचा मृत्यू झाला, तितकेच जखमी झाले. त्यापाठोपाठ जर्मनांनी केलेल्या हल्लय़ात २००० सैनिक बंदी बनले आणि जर्मनीने ५० तोफा काबीज केल्या.

आधुनिक युद्धाच्या इतिहासातील प्रमुख म्हणता येईल असा हा पहिला रासायनिक शस्त्रांचा हल्ला होता. जर्मनीच्या ३५व्या पायोनियर रेजिमेंटच्या सैनिकांनी तोंडाला गॅस मास्क लावून विषारी क्लोरीन वायूची ५७३० नळकांडी उघडली होती. त्यातून केवळ सहा ते आठ मिनिटांत १६८ टन क्लोरीन वायू बाहेर पडला होता. दुसऱ्या दिवशी जर्मनीने कॅनडाच्या सैनिकांविरुद्ध क्लोरीन वायू वापरला. त्यात ५९७५ सैनिक जखमी झाले आणि त्यातील १००० सैनिकांचा मृत्यू झाला.

या रासायनिक हल्लय़ामुळे जर्मनीची जगभरात रानटी म्हणून निंदा करण्यात आली. पण तत्पूर्वी फ्रान्सने जर्मनीविरुद्ध इथिल ब्रोमो—अ‍ॅसिटेट नावाच्या अश्रुधुराच्या द्रवाने भरलेले ग्रेनेड वापरले होते. त्यामुळे जर्मनीला रासायनिक हल्लय़ाचे निमित्त मिळाले होते. ब्रिटिशांनीही अशाच प्रकारची अस्त्रे बनवण्याचे प्रयत्न चालवले होते. पण अद्याप त्यांचा युद्धात वापर केला नव्हता. २७ ऑक्टोबर १९१४ रोजी जर्मनीने ब्रिटिशांविरुद्ध डायनिसिडिन क्लोरोसल्फेट हा फुप्फुसांचा दाह करणारा वायू भरलेले ३००० तोफगोळे डागले होते. पण तोफगोळ्यांच्या स्फोटात त्या वायूची परिणामकारकता हरवली. तसेच जर्मनीने रशियावर केलेल्या हल्लय़ात झायलिल ब्रोमाइड  या अश्रुधुराने भरलेले तोफगोळे डागले. मात्र वाऱ्याची दिशा फिरल्याने हा हल्ला फसला.

आधुनिक युद्धातील हा पहिला रासायनिक हल्ला असला तरी अशा अस्त्रांचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. ख्रिस्तपूर्व ४२३ मध्ये पेलोपोनेशियन युद्धात स्पार्टाच्या सैनिकांनी अथेन्सच्या सैनिकांविरुद्ध आर्सेनिकयुक्त धुराचा वापर केला होता. चीनमधील सुंग घराण्याच्या शासकांनी (इ.स. ९६० ते १२७९) शत्रूविरुद्ध अशाच धुराचा वापर केल्याचे दाखले मिळतात. त्यानंतर २०० वर्षांनी बेलग्रेडजवळ तुर्काचा हल्ला विषारी वायूमुळे परतवण्यात आला होता. जर्मनांनी १५९१ साली शत्रूला पळवून लावण्यासाठी जनावरांच्या शिंगे आणि खुराच्या तुकडय़ांमध्ये रेझिन डिंक मिसळून ती पेटवली आणि घाणेरडा वास येणारा धूर तयार केला.

 

Story img Loader