सचिन दिवाण sachin.diwan@expressindia.com
शस्त्रास्त्रांचे किंवा लष्करी तंत्रज्ञानाचे साधारण पाच प्रकार पडतात. त्यात शत्रूवर हल्ला करण्याची शस्त्रे, शत्रूच्या हल्ल्यापासून बचावाची साधने, सैनिक आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक करणारी दळणवळणाची साधने, सैन्याच्या हालचालींमध्ये सुसूत्रता आणणारी संपर्क यंत्रणा आणि शत्रूच्या हालचाली टिपणारे व आपल्या शस्त्रांना दिशादर्शन करणारे संवेदक (सेन्सर्स) या घटकांचा समावेश होतो. त्यांच्या विकासावर विज्ञान-तंत्रज्ञानाने जसा प्रभाव टाकला आहे तसाच तो भौगोलिक घटकांनीही पाडला आहे.
माणूस जेव्हा उपजीविकेसाठी शिकार आणि शेतीवर अवलंबून होता तेव्हा लढण्याचे तंत्रज्ञानही त्याच दर्जाचे होते आणि दळणवळणाची साधने विकसित झाली नसल्याने त्याचा प्रसारही खूप मंदगतीने होत होता. त्यावेळी जगाच्या विविध भागांत तेथील भोगोलिक परिस्थिती, साधनसामग्रीची उपलब्धता आदी घटकांनुसार लष्करी तंत्रज्ञान तयार होत गेले. भौगोलिक अडथळ्यांमुळे ते ठरावीक भूभागापर्यंतच मर्यादित राहिले. या भूभागांना ‘मिलिटरी इकोस्फिअर्स’ म्हणतात. त्यात मेसोअमेरिका (मध्य अमेरिका), जपान, भारत-आग्नेय आशिया, चीन आणि युरोप (पश्चिम आशियासह) असे विभाग होते. त्यातील युरोप आणि चीन या विभागांत लष्करी तंत्रज्ञानाचा तुलनेने अधिक विकास झाला. मध्य आशियाची गवताळ कुरणे हा या दोन प्रदेशांना जोडणारा आणि लष्करी तंत्रज्ञानाच्या मिलाफाचा दुवा होता. आधुनिक काळात औद्योगिक क्रांतीनंतर या भौगोलिक सीमा विरघळून गेल्या आणि तंत्रज्ञानाचा सर्वत्र प्रसार होऊ लागला. पण तंत्रज्ञानाच्या आणि परिणामी शस्त्रास्त्रांच्या निर्मितीत युरोपने आणि पुढे अमेरिकेने आघाडी घेतली आणि अन्य देशांवर हुकमत गाजवली.
हल्ला करण्याच्या शस्त्रांचे साधारण दोन उपप्रकार पडतात. ‘मेली वेपन’ म्हणजे तलवार, गदा, कुऱ्हाड यांसारखी जवळून हल्ला करण्याची (क्लोझ क्वार्टर) शस्त्रे आणि ‘मिसाइल वेपन’ म्हणजे भाला, बाण यांसारखी दूरवरून हल्ला करण्याची शस्त्रे. त्यातील ‘मेली’ शस्त्रांचा वापर आता केवळ बंदुकीची संगीन आणि कमांडो नाइफ (सुरा) यांच्यापुरताच उरला आहे. बहुतांशी शस्त्रे दुरून हल्ला करणारी आहेत. बंदुकीच्या गोळ्या आणि तोफांचे गोळे डागण्यासाठी आपण गेली साधारण २०० ते ३०० वर्षे एकच पद्धत वापरत आहोत. एका बाजूने बंद नळीत गनपावडर किंवा अन्य स्फोटकांचा स्फोट घडवला की दुसऱ्या बाजूने गोळी (प्रोजेक्टाइल) बाहेर पडते. त्याचा आधुनिक अवतार म्हणजे रॉकेट तंत्रज्ञान. शत्रूला मारण्यासाठी धातूच्या तुकडय़ांचा (गोळ्या, बॉम्बमधील स्प्लिंटर्स आदी) वापर केला जातो. त्यांच्या जोडीला रासायनिक स्फोटकांचा वापर होतो. त्यात अणुस्फोटाने भर घातली आहे. मात्र आजची संपूर्ण शस्त्रास्त्रप्रणाली याच तत्त्वांवर आधारलेली आहे.
आता हळूहळू त्यात बदल होऊ लागला आहे. भविष्यात बंदुकीच्या गोळ्यांना केंद्रोत्सारी बलाने (सेंट्रिफ्युगल फोर्स) गती दिली जाईल. तर तोफगोळे डागण्यासाठी द्रवरूप किंवा वायूरूप स्फोटके वापरली जातील. शस्त्रांमध्ये इलेक्ट्र्नॉनिक उपकरणांचा वाढता वापर होत असल्याने ती नष्ट करण्यासाठी स्फोटकांऐवजी इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स, मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रॉन कणांचा झोत अशा ऊर्जेच्या रूपांचा वापर केला जाईल. हल्ल्यापासून बचावासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्ड, केवलार धाग्यांची चिलखते आदी वापरली जातील.
वाहतुकीची साधने आणि सैनिकांना वातावरणात मिसळवून लपवण्यासाठी (कॅमोफ्लाज) स्टेल्थ तंत्रज्ञान आणि बाह्य़ पृष्ठभागावर वातावरणाच्या प्रतिमा प्रोजेक्ट करून अदृष्य करण्याचा प्रयत्न होईल. सैनिकांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी त्यांना बाहेरून धातू किंवा कॉम्पोझिट मटेरिअल्सचे स्वयंचलित सांगाडे (एग्झोस्केलेटन) बसवले जातील. रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाच्या वापरातून स्वत: विचार करून कृती करणारी शस्त्रे घडवली जातील. बंदुकीच्या साध्या गोळ्याही गायडेड मिसाइलप्रमाणे दिशा बदलून मारा करतील. अंतिमत: शत्रूचा मेंदू आणि मन यावर आघात करून त्याची लढण्याची इच्छा संपवण्यावर भर असेल