सचिन दिवाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोव्हिएत युनियनने ४ ऑक्टोबर १९५७ रोजी स्पुटनिक-१ हा पहिला कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवतालच्या कक्षेत सोडला आणि अवकाश युगाला सुरुवात झाली. सुरुवातीला वैज्ञानिक संशोधनासाठी प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या उपग्रहांमध्ये लवकरच लष्करी वापरासाठीच्या उपग्रहांची भर पडली आणि जमीन, पाणी, आकाश यांच्यासह युद्धाला अंतराळ ही चौथी मिती (डायमेन्शन) मिळाली. डोंगर आणि किल्ले यांसारख्या उंच प्रदेशांना (हाय ग्राऊंड) युद्धशास्त्रात बरेच महत्त्व आहे. विमाने आणि कृत्रिम उपग्रहांनी हाय ग्राऊंडच्या कल्पनेचा आकाश आणि अवकाशापर्यंत विस्तार केला. अंतराळाचे शस्त्रास्त्रीकरण (वेपनायझेशन ऑफ स्पेस) होऊ नये म्हणून अनेक आंतरराष्ट्रीय करार झाले आहेत. तरीही उपग्रहांवरील शस्त्रे आणि उपग्रह पाडण्यासाठीची शस्त्रे यांचा विकास थांबलेला नाही.

शत्रुप्रदेशावर नजर ठेवणे आणि टेहळणी करणे या कामांसाठी विमानांचा वापर करणे शीतयुद्धाच्या काळात अधिकाधिक अवघड बनत चालले होते. टेहळणी विमानांना विमानवेधी क्षेपणास्त्रांचा धोका वाढला होता. त्यामुळे टेहळणीच्या कामासाठी कृत्रिम उपग्रह वापरले जाऊ लागले. ते अशा क्षेपणास्त्रांच्या मर्यादेपलीकडे होते. छायाचित्रणाच्या आणि संदेशवहनाच्या यंत्रणांमधील सुधारणेमुळे उपग्रहांद्वारे केलेली हेरगिरी अधिक प्रभावी होऊ लागली. अल्पावधीत जगातील कोणत्याही प्रदेशाची उत्तम दर्जाची छायाचित्रे मिळवणे शक्य झाले.

उपग्रह दूरसंचार (सॅटेलाइट कम्युनिकेशन) प्रणालींमुळे जमिनीवरील किंवा हवेतील शस्त्रास्त्रांचे दिशादर्शन करणे सुलभ झाले. अनेक उपग्रहांचे जाळे निर्माण करून ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) सारख्या यंत्रणा तयार झाल्या. त्याने स्मार्ट शस्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आदींच्या विकासाला चालना मिळाली. अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक डिफेन्स इनिशिएटिव्ह (एसडीआय किंवा स्टार वॉर्स) प्रकल्पातून क्षेपणास्त्रांवर लेझर किरण किंवा गतिज ऊर्जेवर आधारित शस्त्रे (कायनेटिक एनर्जी वेपन्स) बसवून त्यांचा शत्रूची क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी वापर करण्याचे मनसुबे रचले गेले. सध्या मोबाइल फोन, इंटरनेट, टेलिव्हिजन प्रक्षेपण, एटीएमसारख्या बँकिंग सुविधा अशा अनेक सुविधा प्रामुख्याने उपग्रहांवर आधारित आहेत. त्यामुळे शत्रूची संपर्कयंत्रणा आणि निर्णयप्रणाली उद्ध्वस्त करण्यासाठी प्रथम त्याचे उपग्रह नष्ट करणे याला आधुनिक युद्धात महत्त्व असणार आहे.

शत्रूचे उपग्रह पाडण्यासाठी लेझर किरण, गतिज ऊर्जेवर आधारित शस्त्रे, विद्युतचुंबकीय शस्त्रे (इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स डिव्हायसेस), उपग्रहवेधी क्षेपणास्त्रे (अँटि-सॅटेलाइट मिसाइल्स) आदी शस्त्रास्त्रे विकसित करण्यात आली आहेत. शत्रूचे उपग्रह निकामी करण्यासाठी चीनने खास उपग्रह विकसित केले आहेत. हे उपग्रह पृथ्वीभोवती कक्षेत फिरते ठेवले जातात. युद्धाच्या प्रसंगी ते उपग्रह शत्रूच्या उपग्रहाच्या कक्षेत शिरून त्यांना नष्ट करतात. त्यासाठी या उपग्रहांना यंत्रमानवासारखे कृत्रिम हात किंवा दातांसारखे भाग बसवले आहेत. त्यांच्या मदतीने हे उपग्रह शत्रूच्या उपग्रहाचे लचके तोडल्यासारखे सुटे भाग तोडतात. तसेच हे उपग्रह थेट शत्रूच्या उपग्रहावर धडक देऊन त्यांना नष्ट करतात.

sachin.diwan@ expressindia.com