आज भारतातचं नव्हे तर जगातील ज्या ज्या देशात मराठी जण वास्तव्यास आहे त्या ठिकाणी गणेशोत्सव मोठय़ा जोमात साजरा केला जातो. म्यानमार ज्याला आपण ब्रह्मदेश म्हणतो तेथेही ढोल-ताशांच्या गजरात मराठमोळ्या पद्धतीनं बाप्पाचे आगमन करण्यात आले. मोरया गणेश उत्सव मंडळाने २०१५ पासून म्यानमारमध्ये गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. सात दिवसांसाठी हा गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा होतो. या वर्षी मुंबईत साकारलेली बाप्पाची मूर्ती खास म्यानमारला पाठवण्यात आली आहे.
असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी भारतीय आणि चिनी संस्कृतीचा संगम होतो ती भूमी म्हणजे म्यानमार. मोरया गणेश उत्सव मंडळाने २०१५ पासून म्यानमारमध्ये गणेशउत्सवाची सुरुवात केली आहे. मागील पाच वर्षांपासून म्यानमारची आर्थिक राजधानी यांगॉन येथे हा उत्सव मोठय़ा थाटामाटात साजरा केला जातो अगदी आपल्या मुंबई-पुण्यात केला जातो तसा.
पी ओ पीऐवजी साधी माती वापरून बाप्पांची मूर्तीदेखील गो ग्रीन या संकल्पनेवर साकारली आहे. आपल्या मुंबई- पुण्यात बाप्पांचं जसं आगमन होतं त्याप्रकारची मिरवणूक काढून बाप्पांचं स्वागत केलं गेलं. मोरया गणेशउत्सव मंडळ, म्यानमार आपले भारतीय सण साजरा करण्याचा पूर्ण प्रयत्न करत राहील असं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.