वाई:पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर गावाकडून पुणे मुंबईकडे जाणाऱ्यांनी गर्दी केल्याने पुणे सातारा महामार्गावर ,खंबाटकी घाट व आनेवाडी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होऊन महामार्ग पुन्हा ठप्प झाला. मागील आठ दिवसात महामार्ग ठप्प होण्याची ही दुसरी वेळ आहे.टोल नाक्यावर मोठ्यात मोठ्या रांगा लागल्या आहेत.आज पाच दिवसांचा गणपती व गौरी विसर्जनानंतर कोकण व कोल्हापूर सांगली सीमावर्ती भाग व साताऱ्यातून पुणे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. वाहनांची होणारी गर्दी पाहता आनेवाडी व खेड शिवापूर टोलनाक्यावर अधिकच्या लेन सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही गाड्यांची मोठी गर्दी झाली आहे.शनिवार सायंकाळ पासून महामार्गावर वाहतूक वर्दळ वाढली आहे.
त्यामुळे वाहतूक कोंडी बरोबरच घरी निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.एस टी बस हि हाउस फुल्ल आहेत.सातारा मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी आहे.प्रवाशांची झालेली गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळांच्या वतीने विभागातून जादा बसेसचे नियाेजन केले आहे. महामार्गावर खंबाटकी घाट,अनेवाडी टोल नाका येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी व महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मागील आठवड्यात रस्त्यावर अनेक वाहने बंद पडून वाहतूक कोंडी झाली होती.त्यामुळे महामार्गावरील वाहतूक लोणंद मार्गे साताऱ्याकडे वळविण्यात आली होती.त्यामुळे यावेळी काळजी घेतली जात आहे.