अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.
हे क्षेत्र श्री भगवान शंकरांनी वसविले असून त्यांनीच गणेश मूर्तीची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासूर हा गणेशाने दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत्त झाला होता. त्याने सर्व देवांनाही जिंकले. सर्व देवांच्या विनंतीवरून भगवान शंकराने या दैत्याचे पारिपत्य करण्याचे मान्य केले व येथे शंकराने विनायकास प्रसन्न करून घेतले. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकराने त्रिपुरासुराचे पारिपत्य केले. त्यावेळेपासून या पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागले.
स्थान- ता. शिरूर जि, पुणे हे स्थान पुणे-अहमदनगर राज्य महामार्गावर आहे.
अंतर- रांजणगाव-पुणे ५० कि.मी, रांजणगाव-शिरुर १७ कि.मी, जवळच्या न्हावेरपासून पुणे-सोलापूर मार्गावरील चौफुला येथे जाता येते. चौफुल्याहून थेऊर, मोरगाव व सिद्धटेकला जाता येते.
संग्रहित लेख, दिनांक 12th Sep 2013 रोजी प्रकाशित
अष्टविनायक चौथा गणपतीः रांजणगाव महागणपती
अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे.

First published on: 12-09-2013 at 05:00 IST
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashtavinayak fourth ganpati