Ganpati Decoration 2024 Mumbai Hard Workers Life : मुंबई हे असं शहर आहे की, जिथे अनेकांची स्वप्नं पूर्ण होतात. अनेक जण नवीन स्वप्नं उराशी बाळगून इथे पाऊल ठेवतात. असं म्हणतात की, मुंबईत राहून जर कष्ट करण्याची तुमची तयारी असेल तर तुम्हाला ही मुंबई कधीच उपाशी झोपू देत नाही. नवखा माणूस मुंबईत पहिल्यांदा आल्यानंतर गर्दीत गडबडतो, घाबरतो, चुकतो; पण नंतर तो त्या गर्दीतलाच एक होऊन जातो. मुंबईचा श्वास आहेत ती इथली कष्टकरी माणसं. याच कष्टकऱ्यांमुळे आज मुंबई वेगानं धावतेय, प्रगती करतेय. मात्र, हे कष्टकरी नेहमी दुर्लक्षित राहतात.पण याच कष्टकऱ्यांच्या कार्याला एका तरुणानं गणेशोत्सव देखाव्याच्या माध्यमातून सलाम केला आहे. हा देखावा आतापर्यंतचा सर्वांत भारी असा देखावा आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, एकदा तरी तुम्ही हा देखावा पाहायलाच हवा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परळमधील पराग सावंत या तरुणानं घरगुती गणेशोत्सवानिमित्त मिनीएचर आर्टच्या माध्यमातून हा अनोखा देखावा साकारला आहे; जो पाहिल्यानंतर डोळ्यांसमोर घड्याळाच्या काट्यांवर धावणाऱ्या स्वप्ननगरी मुंबईचं एक हुबेहूब चित्र उभे राहतं. त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी आता मुंबईकरांची तेथे गर्दी होत आहे.

या अनोख्या देखाव्याच्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, या देखाव्यात मुंबईतील प्रत्येक कष्टकरी माणसाची प्रतिकृती साकारली आहे. मग ते मुंबईचे मूळ रहिवासी कोळी बांधव असो, मुंबईकरांचे पोट भरणारे डबेवाले, नालेसफाई करणारे महापालिका कर्मचारी, उंच इमारतीखाली विटा वाहून नेणाऱ्य महिला, दादर फूल मार्केटमध्ये पहाटे ताज्या फुलांची विक्री करणारे फूलविक्रेते, धोबीघाटात काम करणारे धोबीवाले, पेपरविक्रेते, रेल्वे स्टेशनवर बुट-पॉलिश करणाऱ्या व्यक्ती अशी कष्टाची कामे करणाऱ्या कामगारवर्गाच्या हुबेहूब प्रतिकृती या देखाव्यात साकारण्यात आल्या आहेत. इतकेच नाही, तर मुंबईकरांची लाइफलाइन मुंबई लोकल, वरळी सिलिंग, हुतात्मा चौक, माहीम कोळ्यावड्याची प्रतिकृतीदेखील या सुंदर देखाव्यात पाहायला मिळतेय.

मुंबईचे हुबेहूब दृश्य दाखविणाऱ्या या देखाव्याचा व्हिडीओ @parag__sawant
या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही मुंबईचे खूप सुंदर पद्धतीने वर्णन करण्यात आले आहे. ही कॅप्शन नेमकी काय आहे खाली दिली आहे., वाचा..

“कष्टाविना फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते या
मुंबई ही कोणाची हो…
तर मुंबई ही कष्टकऱ्यांची, इथे प्रामाणिकपणे राबणाऱ्या हातांची …
मुंबईला आपलं म्हणणाऱ्यांची

Read More Ganpati Related News : Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीनिमित्त WhatsApp, Facebook वर तुमच्या प्रियजनांना पाठविण्यासाठी खास मराठी शुभेच्छा! पाहा यादी…

मुंबईतील कष्टकऱ्यांच्या जीवनावर आधारित हा देखावा नेटकऱ्यांनादेखील खूप आवडला आहे. अनेकांनी त्यावर खूप छान डेकोरेशन, दरवर्षीप्रमाणे या वेळीही मन जिंकलंस दादा तू…व्वा, गणपती बाप्पा मोरया, मस्तच, दादा डिटेलिंग अप्रतिम.. संकल्पना खूपच सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण, तुम्हाला हा देखावा कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best ganpati decoration 2024 video parel cinematographer parag sawant to replicate mumbai hard working people life mumbai local train worli sea link mahim koliwada for this ganesh utsav sjr