सुशांत मोरे
मुंबई : निवडणूक डोळय़ासमोर ठेवून यंदा गणेशोत्सवानिमित्त मुंबई महानगरातून कोकणात जाणाऱ्या गाडय़ांचे राजकीय पक्षांनी मोठय़ा प्रमाणावर गट आरक्षण केले आहे. यावेळी तीन हजार ४६६ जादा गाडय़ांचे आरक्षण पूर्ण झाले असून त्यात १,९०० हून अधिक गट आरक्षणाच्या गाडय़ांचा समावेश आहे. गट आरक्षणांमध्येही यावेळी ७५० हून अधिक गाडय़ा शिवसेना, भाजप, मनसेने आरक्षित केल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील ठाण्यातील लोकप्रतिनिधींनी ५०० गाडय़ांचे गट आरक्षण केले आहे. त्यापाठोपाठ मुंबईत भाजपने एसटी आरक्षणात आघाडी घेतली आहे.
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रेल्वे गाडय़ांचे तिकीट उपलब्ध होत नसून खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनीही तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. परिणामी, अनेकांनी एसटीने कोकणात जाण्याचा पर्याय निवडला आहे. एसटी महामंडळाने २,५०० जादा गाडय़ा सोडण्याची घोषणा केली होती. मात्र तीन हजार ४६६ जादा गाडय़ा आरक्षित झाल्या आहेत. यापैकी १,९०० गाडय़ा गट आरक्षणाच्या असून राजकीय पक्ष, तसेच आमदार, नगरसेवक, प्रवासी संघटना, स्वयंसेवी संस्था, गणेशोत्सव मंडळे यांनी त्या आरक्षित केल्या आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई तसेच ठाण्यासह अन्य महानगरपालिका निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी गट आरक्षण करण्यात आल्याची चर्चा आहे.
ठाण्यातून शिवसेनेने ५०० गाडय़ांचे गट आरक्षण केले असून ठाण्यातील मनसेकडूनही १०० हून अधिक गाडय़ा आरक्षित केल्या. तर भाजपने दहापेक्षा अधिक गाडय़ा प्रवाशांसाठी सोडल्याचे सांगण्यात आले. याशिवाय मुंबईत भाजपने १५० गाडय़ा गट आरक्षण म्हणून बसगाडय़ा आरक्षित केल्या होत्या. मात्र ऐनवेळी त्यातील १९ गाडय़ा रद्द करण्यात आल्या. परिणामी १३१ गाडय़ा कोकणासाठी रवाना होणार आहेत. भाजपकडून दक्षिण मुंबईतील काही भागातून तसेच शीव, चेंबूर, मुलुंड, वांद्रे, बोरीवली भागातून या गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
आरक्षणाची प्रक्रिया : गट आरक्षणाच्या गाडय़ांसाठी लोकप्रतिनिधी किंवा प्रवासी संघटना, अन्य मंडळे एसटी महामंडळाशी संपर्क साधतात. कोणत्या मार्गावर जादा गाडय़ा सोडणार, किती गाडय़ांची गरज आहे इत्यादी माहिती महामंडळ त्यांच्याकडून घेते आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होताच चालकासह गाडय़ा उपलब्ध केल्या जातात. यासाठी महामंडळ त्या-त्या मार्गावरील तिकीट दराप्रमाणे सर्व आसनांचे पैसे घेऊन गाडय़ा गट आरक्षणासाठी उपलब्ध करते. दीड लाखांहून अधिक जण कोकणाकडे रवाना होणार आहेत. २०१९ मध्ये २ हजार ३८० जादा गाडय़ांचे आरक्षण झाले होते आणि ११ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले होते. यंदा जादा गाडय़ांची संख्या तीन हजार ४६६ पर्यंत पोहोचली आहे.