खारपाडा येथे दर तासाला १२०० गाडय़ा वर्दळ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग : गणेशोत्सवासाठी मुंबई- ठाण्यातील गणेशभक्त शनिवारी सकाळीच कोकणच्या दिशेने निघाले, त्यामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहनांची वर्दळ चांगलीच वाढली होती. दर सकाळच्या सत्रात तासाला बाराशे गाडय़ा खारपाडा टोल नाका येथून पास होत होत्या. म्हणजेच दर मिनिटाला जवळपास वीस गाडय़ा कोकणच्या दिशेने रवाना होत होत्या, तर मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरही सकाळी खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. उत्सवप्रिय कोकणात गणेशोत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. त्यामुळे सणाच्या निमित्ताने मुंबईतून लाखो गणेशभक्त आपापल्या गावाकडे दाखल होत असतात.

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने, शनिवारी सकाळी गणेशभक्त कोकणात जायला निघाले. त्यामुळे मुंबई- गोवा महामार्गासह, मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील वाहनांची वाहतूक प्रचंड वाढली होती. मुंबई- गोवा महामार्गावर खारपाडा येथे सकाळी दर तासाला अकराशे ते बाराशे वाहने पास होत होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात पेण, नागोठणे, कोलाड, इंदापूर, लोणेरे आणि वडपाले परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला होता. अपेक्षेप्रमाणे माणगावजवळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे वाहतुकीस खोळंबा होत होता. दुपारनंतर वाहनांची संख्या काही प्रमाणात कमी झाली. दुपारच्या सत्रात दर तासाला साडेपाचशे वाहने खारपाडा येथून कोकणच्या दिशेला जात होती. त्यामुळे वाहतुकीवरचा ताण कमी होण्यास मदत झाली; पण संध्याकाळनंतर वाहनांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा >>> Ganesh Chaturthi 2023: कोकणची बिकट वाट.., महामार्गावर गणेशभक्तांच्या वाहनांची कोंडी; रेल्वे स्थानकांवर झुंबड

शनिवारी संध्याकाळी मुंबईतून १ हजार २०० बसेस कोकणात जायला निघणार आहेत. त्यामुळे रात्रीनंतर महामार्गावरील वाहनांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महामार्गावरील वाहतूक नियमित आणि सुरळीत सुरू राहावी यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस पोलीस बंदोबस्त महामार्गावर शनिवारपासून तैनात केला आहे. वाहतूक नियमनासाठी चारशे  पोलीस कर्मचारी आणि ३५ पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ४० मोटरसायकल पथकांची महामार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. महामार्गावर १० ठिकाणी प्रवासी सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. 

वाहतूक कोंडीची ठिकाणे

कुठे होऊ शकते वाहतूक कोंडी – नागठणे, कोलाड, इंदापूर आणि माणगाव येथील रस्ते अरुंद आहेत. या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच मार्गिकेवरून सुरू असणार आहे. त्यामुळे शनिवारी रात्री आणि सकाळच्या सत्रात कोलाड, इंदापूर ते माणगाव या ठिकाणी वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा

  मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे गणेशोत्सवासाठी तळकोकणात जाण्यासाठी गणेशभक्त मुंबई- पुणे- बंगलोर महामार्गाचा वापर करत असतात. त्यामुळे गणेशोत्सवकाळात या मार्गावरील वाहतूक वाढते. शनिवारी सकाळी पुणे मार्गिकेवर खालापूर टोल नाक्याजवळ वाहनांच्या एक ते दीड किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र त्याच वेळी बोरघाटात वाहनांची कोंडी नव्हती.

अवजड वाहने रस्त्यावरच

  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई- गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. शासनाकडून तसे आदेशही जारी करण्यात आले आहेत; पण बंदी आदेश झुगारून अवजड वाहने मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर असल्याचे चित्र माणगाव परिसरात दिसून येत होते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट झाली होती. दुपारी माणगाव परिसरात चार ते पाच किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळत होत्या. त्यामुळे हे अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागत होता. एकूणच अवजड वाहतूक बंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र माणगाव येथे दिसून येत होते.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devotees of ganesha left for konkan traffic on highways increased ysh