पनवेल: गौरी गणपतीना विसर्जन होणा-या गणेशमूर्तींपैकी २०९ कुटूंबानी पनवेल महापालिकेकडे मूर्ती दान करण्याचा निर्णय शनिवारी घेतला. यामध्ये सर्वाधिक गणेशमूर्ती दान करण्याचा निर्णय खारघर उपनगरामधील कुटूंबियांनी घेतला आहे. तसेच शनिवारी पनवेलकरांनी संपुर्ण तलाव प्रदुषित करण्याऐवजी महापालिकेने निर्माण केलेल्या २७ कृत्रिम तलावांमध्ये २५२७ मूर्तींचे विसर्जन करुन पर्यावरणाप्रती पनवेलकर जागृत असल्याचे दाखवून दिले. एवढेच नाहीतर नैसर्गिक विसर्जन घाटांवर १० हजार ७५९गणेशमूर्तीं विसर्जित केल्या त्यापैकी साडेचार हजार गणेशमूर्ती शाडूच्या असल्याने त्या काही तासात विरघळल्याचे पालिका प्रशासनाच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले. ५० टक्क्यांहून अधिक शाडूच्या मूर्तींचा वापर पनवेलकर करत असल्याने यंदाचा गणेशोत्सवाची वाटचाली ही ख-या अर्थाने पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या दिशेने झाल्याचे यावरुन स्पष्ट होत असल्याने महापालिका आयुक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.
पनवेल महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी यंदाचा गणेशोत्सव साजरा करणा-या घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध स्तरावर आवाहन केले होते. या आवाहनामुळे दीड दिवसांचे गणेशमूर्ती विसर्जनावेळी संपुर्ण महापालिका परिसरातील ३० कुटूंबांनी त्यांच्या गणेशमूर्तींचे दान पनवेल पालिकेकडे केले. गौरी गणपती विसर्जनावेळी मूर्तीदानाची ही संख्या वाढून ती २०९वर पोहचली आहे.यंदाचे हे पहिले वर्ष असले तरी यास चांगला प्रतिसाद मिळाल्याची चर्चा आहे. पनवेल महापालिकेच्या परिसरातील खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल शहर या उपनगरांमध्ये शनिवारी रात्री १३ हजार ४९५ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी १०हजार ७९५ मूर्ती विविध तलावांवरील विसर्जन घाटांवर विसर्जित करण्यात आल्या. महापालिका प्रशासनाने संपुर्ण तलाव प्रदूषित होऊ नये यासाठी तलावातील विसर्जन घाटावर लोखंडी मनोरा बनवून त्यावर प्लास्टीकचे आच्छादन टाकून मूर्ती विसर्जनासाठी वेगळी सोय केली होती. कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणा-यांमध्ये कामोठे उपनगराने महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ९२८मूर्ती विसर्जित करुन पहिला तर खारघर उपनगराने ९०७ गणेशमूर्ती विसर्जित करुन दूसरा क्रमांक महापालिका क्षेत्रात कमावला.
हेही वाचा >>>दुचाकीवरून घसरून पडलेल्या युवकाला मदत करणाऱ्या पोलिसालाच कारने उडवले, चालकावर गुन्हा दाखल
रविवारी दुपारी दोन वाजता साडेचार हजार नैसर्गिक तलावातील विसर्जन घाटातील मनो-यातून सूरक्षित रित्या काढलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन थेट समुद्रात करण्यासाठी पालिका प्रशासनाने एका बोटीची मदत घेतली. ही बोट रविवारी सायंकाळी कोपरा खाडीमार्गे समुद्रात खोल जाऊन तेथून मूर्ती विसर्जनानंतर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत परत येणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली. महापालिका क्षेत्रामध्ये ६० ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले होते. शनिवारी झालेल्या विसर्जनावेळी या कलशामध्ये ७० मेट्रीकटन निर्माल्य जमा झाले असून खत बनविण्यासाठी या निर्माल्याचा वापर केला जाईल असे महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगीतले. महापालिकेने या ८ नैसर्गिक विसर्जनस्थळ, ७० गणेशमूर्ती दान केंद्र, २७ कृत्रिम तलाव या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, एनएसएसचे विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले होते.