कोल्हापूर : घरगुती गणरायाला शनिवारी भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या म्हणत भक्तांनी पर्यावरणपूरक विसर्जन करण्यावर भर दिला. कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेने तसेच जिल्ह्यातील नगरपालिकांनी यासाठी कुंडाची व्यवस्था केली होती. तेथे भाविकांची दिवसभर गर्दी होती. जिल्ह्यात सायंकाळ पर्यंत ३ लाखांहून अधिक मूर्तींचे पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.कोल्हापूर शरासह जिल्ह्यात पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची पद्धत वाढत आहे. यावेळी पावसाने ओढ दिली असली तरी पंचगंगा नदीत दुथडी भरून वाहत आहे. तरीही बहुतांश नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जन करण्यावर भर दिला. घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज होती.
भागाभागात एकत्रित विसर्जन
इराणी खण येथे विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र बसविण्यात आले होते. त्यावर भाविक आपली मूर्ती क्रमाक्रमाने ठेवत होते. लाडक्या गणरायाला निरोप दिला जात होता. नागरिक – प्रशासन एकत्रित आल्याने गणपती विसर्जनाला यंदाही पर्यावरण पूरक विसर्जन पद्धत रुजल्याचे दिसून आले. वॉर्डनिहाय विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचा लाभ घेत गल्लीतील भाविकांनी स्वयंस्फूर्तपणे एकत्रित जात पर्यावरणपूरक विसर्जनावर भर दिला गेला. पंचगंगा घाटावरही विसर्जन कुंडांची व्यवस्था होती. तेथेही पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन झाले.
हेही वाचा >>>शेतकऱ्याने पंजा मारण्याआधीच शासनाकडून ऊस निर्यात बंदी अध्यादेश मागे – राजू शेट्टी
विसर्जन कुंडावर गर्दी
पंचगंगा नदी तसेच तलावांचे प्रदूषण होऊ नये यासाठी कोल्हापुरात १८० गणेश विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड व मंडळांच्यावतीने काहीलींची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तेथे श्रींचे विसर्जन करण्यासाठी भक्तीची गर्दी झाली होती. इचलकरंजी महापालिकेनेही अशी सोया केली असून तेथेही प्रतिसाद मिळाला. महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी स्वतः घरातील श्रींचे विसर्जन करून कृतिशील आदर्श घालून दिला.
(कोल्हापुरात इराणी खण स्वयंचलित यंत्राद्वारे लाडक्या गणरायाला निरोप दिला जात होता. केले.)