वसई: शनिवारी वसई विरार शहरात पाच दिवसांच्या गणपतींचे गौरींचे मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणपती बरोबर गौराईलाही भक्तीभावाने निरोप देण्यात आला. पाच दिवस अभ्यंग, पंचामृत, धूप, दीप, मोदकांचा नैवद्य असा भक्तांचा पाहुणचार घेत श्रीगणेशाने निरोप घेतला. पालिकेने विसर्जनासाठी ५८ ठिकाणी १०५ इतके कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते.
तर कृत्रिम तलावांचे फिरते हौद ही ठेवले होते.या कृत्रिम तलावाला चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात गणेशमुर्त्या या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आल्या. तर काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.वसईत विसर्जनस्थळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विसर्जनस्थळी होणा-या सामूहिक आरत्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. बाप्पाला निरोप देताना वातावरण भारावून गेले होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जय घोष करत व ढोल ताशा, मृदुंगाच्या गजराने सारी वसई विरार नगरी दुमदुमली होती.
हेही वाचा >>>विरार मध्ये गणेशोत्सव मंडळावर पोलिसांचा छापा; पळताना १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू
विसर्जनादरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तसेच गाव तलावावर महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान सुरक्षारक्षक म्हणून ठेवण्यात आले होते. यावेळी हजारोच्या संख्येने गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी गणेश भक्तांनीही सहकार्य करीत विसर्जन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.