गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवारी षोडशोपचार पूजा केल्यानंतर पाच दिवसांच्या गणपतींना भाविकांनी रविवारी निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा गजर करीत ढोल-ताशाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. यंदा करोनाविषयक निर्बंध हटविण्यात आल्यामुळे समुद्रकिनाऱ्यांसह विसर्जनस्थळी वाजतगाजत गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. रविवारी रात्री उशीरापर्यंत विसर्जन सोहळा सुरू होता.
सोमवारी पहाटेपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती अशा एकूण ३१ हजार ३३८ गणेशमूर्तींचे, आणि २७ हलतालिकांचे अशा एकूण ३१ हजार ३६५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्साव साजरा होत असून गेल्या बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी, तसेच सार्वजनिक मंडळांनी षोडषोपचार पूजा करीत गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गेले पाच दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी पाच दिवसांच्या गणेशाला भाविकांनी निरोप दिला.
गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, ठिकठिकाणचे नैसर्गिक आणि मुंबई महानगरपालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. विसर्जनस्थळाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालांची उधळण करीत भाविक ढोल-ताशाचा तालावर थिरकत होते. रविवारी रात्री उशीरापर्यंत गणेश विसर्जन सुरूच होते. मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार सकाळी ६ वाजेपर्यंत ३०,४४६ घरगुती मूर्तीचे, ८९२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीचे, तर २७ हरितालिकांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यापैकी कृत्रिम तलावात १२,०३० घरगुती, तर ३७७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे, तसेच १६ हरितालिकांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.