माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरींचे रविवारी घरोघरी कोडकौतुक करण्यात आले. गौरीपूजन आणि सायंकाळी पावसाने हजेरी लावली असतानाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिक रस्त्यांवर आले. गणेशभक्तांच्या गर्दीमुळे शहराच्या मध्य भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करावे लागले.
नावीन्यपूर्ण आरास, मिष्टान्नाचा नैवेद्य आणि एकमेकांच्या घरी दिलेल्या भेटी अशा वातावरणात रविवारी घरोघरी पारंपरिक पद्धतीने गौरीपूजन झाले. सायंकाळनंतर रस्त्यांवर गर्दी होऊ लागली. त्यातच पावसाची एक सर आली. मात्र, भर पावसामध्येही उपनगरातून शहरामध्ये आलेल्या नागरिकांचा उत्साह कायम होता. गौरींबरोबरच घरच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर सोमवारपासून उत्सवामध्ये रंग भरेल. ही बाब ध्यानात घेऊन विविध गणेश मंडळांनी रविवारचा दिवस देखावे पूर्ण करण्यावरच व्यतीत केला. घरच्या गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यावर अनेकजण देखावे पाहण्यासाठी रस्त्यावर येतात. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवामध्ये एकच रविवार आल्यामुळे बहुतेक मंडळांनी दुसऱ्या दिवसापासूनच देखावे पाहण्यासाठी खुले होतील याची दक्षता घेतली.
मानाच्या गणपतींसह मोठय़ा मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता यासह शहरातील पेठा आणि मुख्य भाग रात्री गर्दीने फुलून गेला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती. दरवर्षीच्या हलत्या देखाव्यांबरोबरच अनेक मंडळांनी उभ्या केलेल्या जिवंत देखाव्यांना भाविकांकडून पसंती मिळत होती. शहराच्या मुख्य भागाबरोबरच उपनगरांमध्येही रात्री वाहतूक कोंडी झाली होती. रात्री दहापर्यंत ध्वनिवर्धक सुरू ठेवण्यावर असलेले र्निबध आणि सोमवारी विविध शाळांमध्ये होत असलेली गणेश विसर्जन मिरवणूक या बाबी ध्यानात घेऊन पालकांनी लवकरच घरी परतणे पसंत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा