Ganesh Chaturthi 2022: गणेशभक्तांचं आनंदपर्व आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. भाद्रपद मासातील शुक्ल पक्ष चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीला गणराज घरोघरी आगमन करतात. यंदा ३१ ऑगस्ट रोजी बाप्पा भक्तांच्या भेटीला येणार आहेत. योगायोग म्हणजे यंदा बुधवारी बाप्पांचे आगमन होणार आहे, हिंदू मान्यतांनुसार बुधवार हा गणेशाच्या उपासनेचा वार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी गणेशोत्सवाच्या तयारीत दुर्वांना महत्त्वाचं स्थान असतं. गणरायाच्या मूर्तीला २१ दुर्वांची जुडी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते पण तुम्हाला यामागचे खरे कारण माहीत आहे का?(Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थी निमित्त Whatsapp Status, Facebook वर शेअर करा बाप्पाच्या HD Images व मराठी शुभेच्छापत्र)
गणपतीच्या मूर्तीची पूजा करताना सहसा सर्व गोष्टी या चरणाशी अर्पण केल्या जातात मात्र दुर्वा वाहताना त्या बाप्पाच्या मस्तकावर ठेवल्या जातात यामागे एक आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या राक्षसाने ऋषी मुनी आणि देवता यांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणपतीने त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली. गणरायाचा त्रास कमी व्हावा यासाठी अनेक ऋषीमुनींनी प्रयत्न केले मात्र कशानेच गणेशाच्या पोटातील दाह कमी होत नव्हता. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिल्या. (हे ही वाचा: Gauri Ganpati 2022: यंदा गणपतीत ज्येष्ठा गौरी आवाहन कधी? जाणून घ्या तारीख, वेळ, पूजा विधी)
दुर्वा खाल्ल्यावर गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. यानंतर आनंदी होऊन यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे वरदान गणेशाने दिले होते. याच कारणाने दरवर्षी गणेशोत्सवात गणपतीला दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात. (हे ही वाचा: Ganesh Chaturthi 2022: गणरायाच्या मूर्तीतील रंग सांगतात ‘हे’ अर्थ; बाप्पाची महती व पूजा विधी जाणून घ्या)
याशिवाय दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे. मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक आहे. कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. केवळ माणसेच नाही तर मांजर-कुत्री असे प्राणी सुद्धा पोट दुखत असल्यास दुर्वा खातात.