देशात सर्वत्र जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. दोन वर्षांनी निर्बंधमुक्त सण साजरे करायला मिळत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तर भक्तगण वर्षभर वाट बघत असतात. बुधवारी अखेर ही प्रतीक्षा संपली आणि गणपती बाप्पाचे थाटात आगमन झाले. दरवर्षी कोणत्या रूपातील गणपती बाप्पांची स्थापना करायची याची उत्सुकता सर्वांना असते. काही महिन्यां अगोदरच याची जोरदार तयारी सुरू होते. मग यावर्षी कोणत्या विषयाची सर्वात जास्त चर्चा आहे, कोणता विषय ट्रेंडमध्ये आहे यावरून बाप्पाचे रूप, डेकोरेशन यांची निवड केली जाते.
अगदी एखाद्या चित्रपटातील पात्र प्रसिद्ध झाले असले तर त्या पात्राच्या रूपात देखील बाप्पा साकारले जातात. अशाच एका बाप्पाच्या मुर्तीचे रूप सध्या व्हायरल होत आहे. हे रूप ‘केजीएफ’ (KGF) चित्रपटातील प्रसिद्ध पात्र ‘रॉकी’वरून साकारण्यात आले आहे. या ‘रॉकी’स्टाईल गणपतीवरून ट्विटरवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – गणेशोत्सवानिमित्ताने मुंबई पोलिसांचं भन्नाट गाणं; देवेंद्र फडणवीसांनीच केलं शेअर; पाहा गाण्याचा Video
‘केजीएफ’मधील ‘रॉकी’ स्टाईल बाप्पाच्या हातात मशीनगन दिसत आहेत. रॉकीच्या लोकप्रिय पोशाखात बाप्पा दिसत आहे. या रुपाला अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. ज्या दृश्यातील रॉकीचा लूक निवडण्यात आला आहे, तोंड अतिशक हिंसक सीन आहे. या सीनमध्ये रॉकी मशीन गनचा वापर करून आधी पोलिसांच्या गाड्या आणि नंतर पोलिस चौकीचं उडवतो.
हिंसेचे समर्थन करणाऱ्या रॉकीच्या रूपात बाप्पाला पाहणे अनेक जणांना आवडले नाही. तसेच रॉकी चित्रपटात सोन्याची तस्करी करतो असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीच्या पात्रावरून बाप्पाचे रूप साकारणे ही संकल्पना अनेकांना पटली नाही. अनेकांनी यावर त्यांचे मत ट्विटरवर व्यक्त केले.