सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची भक्तगण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतात. मागची दोन वर्ष करोनामुळे अनेक नियमांच्या बंधनांमध्ये सण, उत्सव साजरे करावे लागले. पण आता सर्वकाही पुर्ववत सूरू झाले आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव अधिक जल्लोषात साजरा केला जाणार हे नक्की. बाप्पासाठी फुलांची आरास, वेगवेगळ्या थीमचे डेकोरेशन यासोबतच प्रसादाचे प्लॅनिंग सुद्धा आता पासुनच सुरू झाले असणार. मोदक, लाडू, वेगवेगळी मिठाई असा प्रसाद बाप्पाला दाखवला जातो. पण रोज बाप्पासाठी काहीतरी नवीन प्रसाद काय बनवायचा? हा प्रश्न घरातल्या स्त्रियांपुढे पडतो. तसेच सण असताना घरात असणारे गोड पदार्थ मधुमेह असणाऱ्यांना खाता येत नाहीत. त्यांना प्रसाद खाताना देखील हात आखडता घ्यावा लागतो. या दोन्ही गोष्टींवरील उपाय म्हणजे एक खास रव्याचा शिरा. हो हा खास शिरा विशिष्ट पद्धतीने बनवला तर तुमची प्रसाद काय बनवायचा ही चिंता दूर होईल आणि घरातील मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना मनसोक्त प्रसादाचा आस्वाद घेता येईल. चला तर मग जाणून घेऊया हा प्रसाद बनवण्याची रेसिपी.
आवश्यक सामग्री
तूप, रवा, पाणी, साखर, अंजीर, सुकामेवा – काजू, बदाम, पिस्ता, मनुके, केसर आणि दुध.
शिरा बनवण्याची रेसिपी
शिरा बनवण्यासाठी कढईत थोडे तूप गरम करा. त्यात सुकामेवा तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या आणि नंतर एका भांड्यात काढून घ्या. आता एका भांड्यात दुध गरम करून त्यात थोडे केसर टाका. दुसरीकडे थोडी वेलचीची पूड तयार करून ठेवा.
आता कढईमध्ये थोडे तूप टाकून रवा भाजून घ्या. रवा भाजल्यानंतर त्यात पाणी टाका. त्यानंतर यात साखर टाका आणि गॅस थोडावेळ मध्यम आचेवर ठेवा. आता यात वेलची पावडर, केसर घातलेले दुध आणि सुकामेवा टाका. व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करा. आता हा शिरा प्रसाद म्हणून गणपती बाप्पाला दाखवू शकता.
मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी असा बनवा खास शिरा
मधुमेही रुग्णांसाठी शिरा बनवताना साखर टाकण्याऐवजी शिऱ्यामध्ये अंजीरचे तुकडे करुन टाकू शकता किंवा साखरेऐवजी गुळाचा देखील वापर करू शकता. अशाप्रकारे शिरा बनवल्यास मधुमेह असणाऱ्या व्यक्ती देखील मनसोक्त प्रसादाचा आस्वाद घेऊ शकतील.