ganesh chaturthi 2023 : लाडक्या बाप्पा विराजमान होताच चर्चा होते ती त्यांच्या भोवतीच्या सजावटीची आणि त्यांच्यासाठी खास साकारलेल्या देखाव्यांची. अनेकजण आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती बाप्पाची आरास ही वेगळी, हटके आणि इतरांपेक्षा वेगळी असावी यासाठी प्रयत्न करत असतात. यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खास देखाव्यांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. यामुळे गणेशोत्सव मंडळांचे हे देखावे पाहण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. अशाचप्रकारे एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने व्यायाम करणाऱ्या उंदरांचा देखावा साकारत निरोगी आरोग्याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ २०२२ मधील असला तरी तो आता अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, श्री गणरायाचे वाहन म्हणून ओळखले जाणारे उंदीर देखाव्यात जिममध्ये वेगवेगळे व्यायाम प्रकार करताना दाखवण्यात आले आहेत. यात जिममधील व्यायामसाठी लागणाऱ्या मशीनरी देखील देखाव्यात मांडण्यात आल्या आहेत आणि त्यावर उंदीर मामा व्यायाम करताना दिसत आहे. जिममधील एक हुबेहुब दृश्य या देखाव्यात मांडण्यात आले आहे. जिमवर आधारित या देखाव्याच्या मधोमध गणपती बाप्पा विराजमान आहेत. या देखाव्याच्या माध्यमातून निरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी व्यायाम किती महत्वाचा असतो हा संदेश देण्यात आला आहे. सर्वोदय मित्र मंडळ, प्रबोधनात्मक तांत्रिक देखावा २०२२, आरोग्यम धनसंपदा अशा या देखाव्याच्या बॅनरवर लिहिले आहे.
सध्या तरुणांमध्ये जिममध्ये जाऊन शरीर फिट ठेवण्याची क्रेझ वाढताना दिसतेय. त्यामुळे हाच विषयाला धरु संबंधित मंडळाने व्यायामावर आधारित हा हटके गणेशोत्सव देखावा साकारला आहे.
सुंदर देखाव्याचा हा व्हिडीओ ganpati_bappa_india या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये गणपती बाप्पा मोरया असे लिहिले आहे.