Ganeshotsav 2023: राज्यभरात गणेशोत्सवाची एक मोठी धूम पाहायला मिळते. यंदा १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईकर दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप उत्सुक आहेत. कारण- मुंबईत दरवर्षी गणेशोत्सवाचा एक वेगळा उत्साह, वातावरण पाहायला मिळते. मुंबईत आठवडाभरापूर्वीच अनेक मंडळांनी वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात गणरायाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात केली आहे. उंच गणेशमूर्ती भव्य-दिव्य सजावट, आकर्षक रोषणाई व देखावे हे मुंबईतील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असते. त्यामुळे गणेशोत्सव काळात मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणपती मंडळांमध्ये मुंबईसह जगभरातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. मुंबईतील अनेक सार्वजनिक मंडळांनी केलेली आरास, सजावट पाहण्यासाठी देश-विदेशांतून लोक मुंबईत दाखल होत असतात. पण, अनेकदा मुंबईत नवीन आलेल्या लोकांना किंवा मुंबईत राहूनही काही जणांना या मंडळांपर्यंत पोहोचायचे कसे हे माहीत नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपर्यंत कसे पोहोचू शकतो हे सांगणार आहोत.
१) लालबागचा राजा (Lalbaugcha Raja 2023)
‘नवसाला पावणारा राजा’ म्हणून मुंबईतील ‘लालबागच्या राजा’ची ख्याती आहे. हा बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळे राजाच्या दर्शनासाठी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसापासूनच भाविक रांगेत उभे असतात. केवळ मुंबईतूनच नाही, तर देशभरातून आलेल्या भक्तांची रांग येथे लागते. त्यामुळे प्रसिद्ध लालबागचा राजाची झलक यंदाही पाहण्यासाठी प्रत्येक जण खूप उत्सुक आहे
ठिकाण- पुतळाबाई चाळ, श्रीगणेश नगर, लालबाग, परळ.
जवळचे रेल्वेस्थानक : कॉटन ग्रीन (हार्बर लाईन), चिंचपोकळी, भायखळा (मध्य लाईन), लोअर परेल (वेस्टर्न लाईन)
कसे पोहोचाल? – या सर्व रेल्वेस्थानकांवरून तुम्ही चालत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाऊ शकता. शक्य नसल्यासच टॅक्सीचा पर्याय निवडा. कारण- गणेशोत्सव काळात येथील रस्त्यावर ट्रॅफिक खूप जाम असते. परळ आणि दादरहूनही लालबागला बसेस जातात.
२) गणेश गल्लीचा राजा
‘मुंबईचा राजा’ म्हणून गणेश गल्लीतील राजाची ख्याती आहे. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून (गणेश गल्ली) दरवर्षी गणरायाच्या आकर्षक भव्य-दिव्य मूर्तीची स्थापन करतात. त्याशिवाय गणरायाच्या आजूबाजूला केली जाणारी सजावट आणि भव्य सेट, असे नयनमनोहारी दृश्य भाविकांना खूपच मोहून टाकते. त्यामुळे लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविक गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
ठिकाण – गणेश गल्ली (लेन), लालबाग, परळ
जवळचे स्टेशन – चिंचपोकळी, करी रोड व लोअर परळ
कसे पोहोचाल – लोअर परळ किंवा करी रोड रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर चालत किंवा टॅक्सीने तुम्ही गणेश गल्लीत पोहोचू शकाल.
३) चिंचपोकळीचा चिंतामणी
चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती आपल्या भव्य-दिव्य आगमन सोहळ्यासाठी प्रसिद्ध आहे. कारण- लालबागचा राजा, तेजुकाया आणि गणेश गल्लीतील गणेशमूर्ती जागेवरच तयार होते; मात्र चिंचपोकळीच्या चिंतामणीचे अगदी वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात आगमन होते. चिंचपोकळीचा चिंतामणी मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक आहे. लोभस मूर्तीमुळे हा गणपती अधिकच आकर्षक वाटतो. या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठीही देशभरातून भक्त येत असतात.
ठिकाण : दत्ताराम लाड मार्ग, चिंचपोकळी
जवळचे रेल्वेस्थानक – चिंचपोकळी
कसे पोहोचाल- चिंचपोकळी रेल्वेस्थानकावर उतरून अगदी चालत चिंतामणीच्या दर्शनाला पोहचू शकता.
४) तेजुकाया मॅन्शन गणपती
लालबागचा राजा, गणेश गल्लीतील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर गणेशभक्त तेजुकाया मेन्शनमधील गणपतीच्या दर्शनासाठी जातात. तेजुकायाची आकर्षक मूर्ती, आजूबाजूचा देखावा पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. हत्तीसारखे गंडस्थळ, सुपाएवढे कान व लंबोदर, अशी २१ फूट उंचीची गणेशमूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तुम्हाला या वर्षी तेजुकाया मॅन्शनचा गणपती पाहायला जाणार असाल, तर पत्ता जाणून घ्या.
ठिकाण – तेजुकाया मॅन्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, गणेश गल्ली, लालबाग.
जवळचे रेल्वेस्थानक – करी रोड, चिंचपोकळी
कसे पोहोचाल – करी रोड आणि चिंचपोकळी रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर तुम्ही चालत पोहोचू शकता.
५) परळचा राजा
परळचा राजा हा मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक आहे. या गणपतीला नरे पार्कचा राजा किंवा परळचा राजा या नावाने ओळखले जाते. उंच आणि भव्य गणेशमूर्ती हे परळच्य राजाचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे दरवर्षी अगदी वाजत-गाजत थाटामाटात या गणपतीचा आगमन सोहळा पार पडतो. या राजाची आगळीवेगळी आणि सर्वांत उंच मूर्ती दरवर्षी सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी ठरते. त्यामुळे भाविक दरवर्षी या राजाच्या दर्शनासाठीही रांगा लावतात.
ठिकाण- नरे पार्क अभ्यासिका, नरे पार्क, परळ.
जळवचे रेल्वेस्थानक- परळ, प्रभादेवी
कसे पोहोचाल – तुम्ही परळ आणि प्रभादेवी रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर चालत किंवा टॅक्सीने येथे पोहोचू शकता; शिवाय दादर रेल्वेस्थानकावरूनही तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी टॅक्सी किंवा बस मिळेल.
६) गिरगावचा राजा
शाडूच्या मातीपासून बनवलेली १६ फुटांची गणेशमूर्ती हे गिरगावच्या राजाचे वैशिष्ट्य आहे. शाडूच्या मातीपासून बनवली जाणारी मुंबईतील ही एकमेव भव्य मूर्ती असेल, असे म्हणायला हरकत नाही. बाप्पाचा लांबसडक लोभस चेहरा हेही या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य असते. आजही अगदी पारंपरिक पद्धतीने या गणपतीच्या आजूबाजूला सजावट केली जाते. स्वातंत्र्यकाळाच्या आधीपासून या गणरायाची स्थापना होत आहे. अनेक सामाजिक उपक्रमही या मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात.
ठिकाण – निकदवरी लेन, गिरगाव
जवळचे रेल्वेस्थानक – चर्नी रोड
कसे पोहोचाल – चर्नी रोड रेल्वेस्थानकावर उतरून तुम्ही अगदी चालत जाऊन गिरगावच्या राजाचे दर्शन घेऊ शकता.
७) केशवजी नाईक चाळ
मुंबईतील सर्वांत पहिला सार्वजनिक गणपती आणि मानाचा गणपती म्हणून केशवजी नाईक चाळीतील गणपती ओळखला जातो. या वर्षीचे त्यांचे १३१ वे वर्ष आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आणि लहान गणेशमूर्तींसाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा गणपती आहे. गणपतीच्या मूर्तीला पालखीत बसवून अगदी पारंपरिक पद्धतीने आगमन आणि विसर्जन सोहळा पार पडतो. त्यामुळे मुंबईतील मराठमोळी पारंपरिक पद्धत टिकवून ठेवणाऱ्या या मंडळाचा गणपती पाहण्यासाठी दूरवरून भाविक येत असतात.
ठिकाण – केशवजी नाईक चाळ, खाडिलकर रोड, गिरगाव
जवळचे रेल्वेस्थानक – चर्नी रोड
कसे पोहोचाल – चर्नी रोड रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर खाडिलकर रोडसाठी टॅक्सी करू शकता. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर तुम्ही केशवजी चाळीबद्दल विचारूनही तिथे पोहोचू शकाल.
८) अंधेरीचा राजा
उपनगरातील प्रसिद्ध गणपती म्हणून अंधेरीच्या राजाची ओळख आहे. दरवर्षी सिंहासनस्थ विराजमान, अशी या राजाची मूर्ती असते. या राजाचे वैशिष्ट म्हणजे तुम्हाला २१ दिवस म्हणजे संकष्टी चतुर्थीपर्यंत येथे दर्शनासाठी जाता येते. दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर या गणपतीची सजावट केली जाते. मुंबई आणि राज्यभरातील भाविक या राजाच्या दर्शनसाठी येत असतात.
ठिकाण – गणेश मैदान, आझाद नगर-२, वीर देसाई रोड, अंधेरी (प.)
जवळचे रेल्वेस्थानक – अंधेरी
कसे पोहोचाल – अंधेरी रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर आझाद नगर-२ साठी रिक्षा करू शकता.